कणकवली/-

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी.तसेच सर्व पत्रकारांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे,अशी मागणीचे निवेदन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना देत आमच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवा.तसेच जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदार रमेश पवार यांना अध्यक्ष भगवान लोके यांनी निवेदन दिले. यावेळी यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे,सुधीर राणे, चंद्रशेखर देसाई, तुषार सावंत, चंद्रशेखर तांबट, पप्पू निमनकर, विराज गोसावी, अनिकेत उचले, विवेक ताम्हणकर, संजय पेटकर,ओमकार ढवण आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे…
महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं आहे.माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलेलं नाही.५०० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे, ५० च्या जवळपास पत्रकारांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत, आणि कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना यौध्दे असून कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनानं २५ पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही.आपणास विनंती की, सरकारने घोषणा केल्या प्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रूपयांची आर्थिक मदत मिळावी.

पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना विमा योजनेचे कवच दिले जाईल आणि त्याबाबतचा निर्णय पुढील कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. या गोष्टीलाही पंधरा दिवस झाले पण विम्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो तातडीने व्हावा अशी विनंती आहे.

माथेरानचे संतोष पवार किंवा पुण्याचे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने झाला आहे. पुन्हा अशी वेळ कोणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी पत्रकारांना अग्रक्रमाने बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होईल अशी व्यवस्था व्हावी आणि त्यासंबंधीचा अध्यादेश लगेच काढला जावा.
पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते.त्यानुसार पुणे आणि रायगडच्या सिव्हिल सर्जन यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीचे काय झाले ते समजले नाही.दोन्ही पत्रकारांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे.

वरील मागण्यांची सरकारकडून दखल घेतली न गेल्याने आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी राज्यातील पत्रकार प्रत्येक तालुक्यातील तहसिल समोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आहोत.तसेच आरोग्य मंत्र्यांकडे एसएमएस पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आहोत.
आपणास विनंती की, अडचणीत आलेले माध्यम क्षेत्र आणि असंख्य पत्रकारांवर आलेली बेकारीची वेळ लक्षात घेऊन वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी आमची आग्रहाची विनंती असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page