फरार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांची संपत्ती किती? धक्कादायक माहिती समोर.;लाच प्रकरणात अडकल्यापासून फरार आहेत वैशाली झनकर..

फरार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांची संपत्ती किती? धक्कादायक माहिती समोर.;लाच प्रकरणात अडकल्यापासून फरार आहेत वैशाली झनकर..

वैशाली वीर यांच्या घराची एसीबीकडून झडती घरं, जमिनी संदर्भात मिळाली महत्त्वाची माहिती..

ठाणे /-

८ लाख रुपायांच्या लाचखोरी प्रकरणातील फरार आरोपी नाशिक जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांचा एसीबीकडून त्यांचा शोध सुरू आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) वीर यांच्या घराची झडती घेतली असून त्यातून झनकर यांच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैशाली वीर यांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी चार फ्लॅट, जमीन, कार, दुचाकी तसेच ४० हजारांची रोकड आणि काही बँकांचे पासबुक असल्याचे आढळून आले आहे. झनकर यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे जमीन, कल्याणमधील मिलिंदनगर येथे ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० आणि १३.१० गुंठे जमीन, सिन्नरमध्येच आणखी ०.५६ गुंठे, ०१.५१ गुंठे, ०३.४१ गुंठे जमीन आहे. सिन्नरमध्ये ०.२२.७० गुंठे क्षेत्राची मालमत्ता, ४० हजारांची रोकड, होंडा सिटी कार, दुचाकी त्यांच्या नावे आहे. त्याशिवाय, वेगवेगळ्या बँकांचे पासबुकही झडतीत एसीबीला मिळाले आहेत.

याच प्रकरणातील दुसरा आरोपी वाहन चालक ज्ञानेश्वर येवले याच्या घरझडतीमध्ये त्यांच्यासह पत्नी आणि मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांचे पासबुकसह दोन गाड्यांचे आरसीबुक मिळाले आहेत. प्राथमिक शिक्षक दशपुते यांच्या नावे नाशिक येथे ते राहत असलेला टू बीएचकेचा फ्लॅट, दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याची बाब समोर आली आहे.

काय आहे हे प्रकरण?

एका शिक्षण संस्थेच्या चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. या मंजूर अनुदानाप्रमाणे शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचे नोव्हेंबर २०२० पासून थकीत वेतन काढून देण्यासाठी तसेच मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे वेतन पुढे नियमित पुढे सुरू ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्या वतीने प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराकडे ९ लाखांची लाच मागितली. याबाबत एसीबीने पडताळणी केली असता, वीर यांनी तडजोडीअंती ८ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. शिवाय पुढील व्यवहार त्यांचे शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले यांच्याशी करण्याविषयी सांगितले होते. मंगळवारी एसीबीने नाशिकमध्ये कारवाई करत शिक्षणाधिकारी यांच्या वतीने तक्रारदाराकडून ८ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला एसीबीने रंगेहात पकडले. तसेच वीर आणि दशपुते यांनाही एसीबीने ताब्यात घेत तिघाहीविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर एसीबीने तिघाही आरोपींच्या घरी छापे मारत घराची झडती घेतली. मात्र, शिक्षणाधिकारी वीर या अचानक फरार झाल्याने एकच खळबळ उडाली. एसीबीकडून त्यांचा शोध घेण्यात घेत असून लवकरात लवकर त्यांना अटक केले जाईल असे एसीबीकडून सांगण्यात आले. तर, एसीबीने अटक केलेल्या येवले आणि दशपुते यांना न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

अभिप्राय द्या..