पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाने परत घेतले पण त्यामागील हे आहे कारण…

मुंबई /-

रत्नागिरीतील खेड तालुक्यातल्या पोसरे गावामध्ये पूरग्रस्तांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती.

दरम्यान, चेक परत घेण्यात आल्याचं वृत्त खरं असल्याचं खुद्द पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, दिलेले चेक परत घेण्याचं कारण वेगळं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील याला दुजोरा दिला असून प्रसारमाध्यमातून प्रसारित केले जाणारे वृत्त सत्य परिस्थितीला धरून नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लाभार्थ्यांच्या विनंतीवरून घेतला निर्णय, पण चुकीची बातमी पसरली:-

या मुद्द्यावर स्थानिक जिल्हा प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. चेक वाटपाबाबत चुकीची बातमी पसरली होती. खेडमधल्या पोसरेमधील चार मयतांच्या वारसांना चेकचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याचा तपशील वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यांची बँक ३० किलोमीटर लांब असल्यामुळे त्यांचे चेक घेऊन पैसे थेट बँकेत जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या विनंतीनुसार मदत करण्यासाठी संबंधित तलाठ्यांनी चेक परत घेतले होते. सध्या सर्व चेक बँकेत जमा झाले आहेत”, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..