जलशक्ती मंत्रालय राबवणार स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव सोहळा…!

जलशक्ती मंत्रालय राबवणार स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव सोहळा…!

२० जुलै पर्यंत अर्ज सादर करण्यातचे केले आवाहन…

सिंधुदुर्ग /-

ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात मोठया प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्ययकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

या स्पर्धेत दोन वेगवेगळया भागातील विषयात लघुपटाची निर्मिती करुन स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट You-Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने http:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह 20 जुलै, 2021 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी भाग एक करीता हागणदारीमुक्त लघुपट निर्मिती करावयाची असून यासाठी जैव- विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय आहेत. यासाठी प्रथम पारितोषिक 1 लाख 60 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 60 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. भाग- 2 साठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मितीचे करावयाची आहे. यासाठी विषय- वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपटटी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र हे देण्यात आले आहेत. याकरीता प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, व्दितीय पारितोषिक 1 लाख 20 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 80 हजार रुपये असे असणार आहे. प्रत्येक क्षेत्राकरिता प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.

सहभागासाठी मार्गदर्शक सूचना

केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी, सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील सहभाग घेऊ शकतात. लघुपटांचा कालावधी कमीत कमी 1 ते 5 मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्विकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम व अटींच्या अधीन राहून आवेदन व अर्ज सादर करावेत. सदर लघुपटनिर्मिती स्पर्धेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकुर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..