एस.टी.च्या स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची नागरिकांची मागणी..

एस.टी.च्या स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची नागरिकांची मागणी..

कणकवली /-

सिंधुदुर्ग राज्य परिवहन विभागाने २८ जूनपासून सुरु केलेल्या लांब पल्ल्याच्या एस. टी. च्या फेऱ्यांना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा अलीकडे रत्नागिरी जिल्हाशी फारसा संबध नसल्याने रत्नागिरी फेऱ्यांना अत्यल्प प्रतिसाद आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या अद्याप सुरू नसल्याने खेड्यापाड्यांतील जनतेची मोठी गैरसोय होत आहे. या फेऱ्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी सर्वं स्तरावरून होत आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी कोल्हापूर, पुणे गाड्यांना जेमतेम प्रवासी प्रतिसाद मिळत आहे. पण अन्य लांब पल्ल्याच्या गाड्यांना किरकोळ प्रवासी मिळत आहेत. विजापूरला कुडाळहून सकाळी आणि सायंकाळी दोन फेऱ्या सुरू आहेत. कर्नाटकातील या भागात शेतीसाठी जाणारे कन्नडींग मजूर पहिल्या काही दिवसांत रवाना झालेत. ग्रामीण भागात रहाणाऱ्या अशा मजूरांना स्थानिक गाड्या नसल्याने शहराच्या ठिकाणी येता येत नसल्याने गावात अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे आता प्रवाशांची संख्या रोडावली आहे. सद्या पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्हात कामांची मंदी असल्याने विजापूरहून येणार्याची वानवा आहे. त्यामुळे विजापूरहून येणार्या गाड्यांना प्रवासी क्वचित असतात. अक्कलकोट, सोलापूर, निपाणी आदी गाड्यांना प्रवाशांची वानवा आहे. डिजेलचा खर्च निघत नाही, असे चालक-वाहकांचे म्हणणे आहे.

कणकवली-सावंतवाडी अशा दिवसातून नऊ फेऱ्या धावतात. पण ग्रामीण भागातील लोक शहरात पोचू शकत नसल्याने या फेऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद नाही. रत्नागिरी परिसरात आता कामांसाठी जाण्याचे ठोस कारण नसल्याने या फेऱ्यांना अत्यल्प प्रवासी मिळत आहेत. या सर्व कारणांमुळे एस. टी. चे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे अद्याप ग्रामीण भागातील फेऱ्या तुरळक सुरू झाल्याने लोकांना शासकीय कामासह, वैद्यकीय, शेती, बाजारहाट आदी करण्यासाठी शहरांच्या ठिकाणी येता येत नाही.सध्या रानभाज्याचा मौसम आहे. शेतात भाजीपाला तयार आहे. मात्र शहरात पोचण्यासाठी एस. टी. च नसल्याने गरीब माणसे चार पैसे मिळवण्यासाठी येऊ शकत नाहीत. ताजी-सुकी मच्छी विक्रेत्या महिलांची हिच परिस्थिती आहे. खेकड्यांच्या गाथणी गायब झाल्या आहेत. गावात बसून कुंटुबाचे पोट कसे भरायचे, या विवेचनेत ही मंडळी आहेत. मुंबई-पुणे आदी शहरांतील बसेस भरभरून प्रवासी वाहतूक करतात. खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. राज्यातील रेल्वे प्रवासी जोमात सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातील गरीब जनतेवर अन्याय होत आहे. राज्य शासनाने आणि एस. टी. ने राज्यातील ग्रामीण भागातून गाड्यांच्या फेर्यां त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी सार्वत्रिक जोर धरू लागली आहे.

अभिप्राय द्या..