ओरोस /-

सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३८ वा वर्धापन दिन १ जुलै होत आहे. यावेळी विविध सामाजिक, सहकार क्षेत्राला भक्कम करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१२ पासून कार्यरत असलेल्या बँकेच्या डाटा सेंटरचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. टायर थ्री ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. राज्यात जिल्हा बँकेने सुरु केलेली ही पहिली सुविधा आहे. याचा शुभारंभ दुपारी ३ वाजता देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी पत्रकार परिषदेत दिली. सिंधूदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक विकास सावंत उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सतीश सावंत यांनी जिल्हा बँक स्थापना १ जुलै १९८३ रोजी झाली. बँकेची नाळ सामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, बचतगट, शालेय विद्यार्थी यांच्याशी जोडलेली आहे. संचालक व अधिकारी-कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे जागतीक मंदी, नोटाबंदी ते सध्या सुरु असलेला कोरोना काळा ही आवाहने समर्थपणे पेलली आहेत. “वीना सहकार नाही उद्धार” हे ब्रीद वाक्य जोपासत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन प्रगतशील वाटचाल सुरु ठेवली आहे, असे सांगितले. ३८ वा वर्धापन दिन कोरोना नियम पाळत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डाटा सेंटरच्या टेक्नोलॉजीमध्ये बदल झाला आहे. याचा विचार करून जिल्हा बँकेने टायर थ्री या दर्जाचे अत्याधुनिक डाटा सेंटर प्रधान कार्यालयात सुरु केले आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक व्यवहार सुरक्षितता वाढणार असून सेवा तात्काळ व देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे. त्याचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने शरद पवार करणार आहेत. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापुर जिल्हा पालकमंत्री बंटी पाटील ऑनलाईन तर खा विनायक राऊत, आ दीपक केसरकर, आ वैभव नाईक प्रत्येक्ष उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सतीश सावंत यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page