प्रकल्प बंद बाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

आचरा /-


कोळंबी प्रकल्पामुळे विहिरींचे पाणी दुषीत झाले, शेतीचे नुकसान होत आहे ,आता संपूर्ण पारवाडी डोंगरेवाडी विस्थापित होण्याची वाट प्रशासन बघतय काय अशी संतप्त भावना व्यक्त करत पारवाडी डोंगरेवाडी येथील ग्रामस्थांनी निकराची लढाई करून प्रकल्प हटवायचाच असा निर्धार आचरा ब्राह्मण देव मंदिर येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. यासाठी जिल्ह्याधिकारी याची भेट घेऊन प्रकल्प बंद करण्यासाठी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनासाठी ग्रामस्थ व सरपंच म्हणून ग्रामस्थांसोबतच असल्याचे सरपंच प्रणया टेमकर यांनी सांगितले.

आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथे कार्यरत असलेल्या कोळंबी प्रकल्पाचा फटका याभागाला बसत असल्याने हा प्रकल्प बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाबद्धल तीव्र असंतोष निर्माण झाला होता.यातच ग्रामसभेत गठीत केलेल्या प्रकल्प विरोधी समितीचेही सहकार्य मिळत नसल्याने संतापलेल्या पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि समितीसह ग्रामस्थांची एकत्रित बैठक ब्राह्मण देव मंदिर येथील सभामंडपात आयोजित करुन समितीकडून प्रकल्प विरोधी लढाईत सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. २२मार्चच्या ग्रामसभेत प्रकल्प विरोधी २१सदस्यांची समिती गठीत करुनही तीन महिन्यात एकही सभा का लागली नाही असा प्रश्न सरपंच टेमकर यांच्या समोर उपस्थित करत पारवाडी येथील ग्रामस्थांनी प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीचा पाढाच सरपंच टेमकर यांच्या समोर वाचला.मतदानापुरतेच ग्रामस्थांचा कळवळा दाखविणारे या भागाचे आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना लोकांच्या त्रासाची दखल घेता आली नाही हे दुर्दैव असल्याचे म्हणत ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पामुळे प्रत्येक विहीरीला कोरोना झाला असून पाणी खारे झाले आहे. त्याची तपासणी झाली पाहिजे.असे सुरेश ठाकूर यांनी सांगितले. रवींद्र बागवे यांनी प्रकल्प विरोधी ग्रामस्थ जेव्हा मत्स्य विभाग अधिकारी यांना भेटले तेव्हा त्यांनी प्रकल्प बंद करण्यासाठी संबंधितांना दोन नोटिसा दिल्याचे सांगितले याबाबत सरपंच टेमकर यांना बागवे यांनी विचारल्यावर अशा प्रकारची तोंडी माहिती किंवा लेखी पत्रही ग्रामपंचायतला प्राप्त नसल्याचे सांगितले.यावेळी
पर्शुराम शेट्ये यांनी संबंधित प्रकल्प धारकाने सीसीटीव्ही कँमेरे लावले, उभ्या केलेल्या पंपशेडला ग्रामपंचायतीची परवानगी नाही, कर्मचारी काम करत असून शौचालय नाही असे असताना ग्रामपंचायत कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच प्रणया टेमकर यांनी प्रकल्प विरोधी लढ्यात आपण ग्रामस्थांसोबतच असल्याचे सांगून रजेवर असलेल्या जिल्हाधिकारी पाच जुलै नंतर हजर झाल्यावर भेट घेतली जाईल. यात ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनात आपण ग्रामस्थांसोबतच असल्याची ग्वाही सरपंच टेमकर यांनी उपस्थितांना दिली.
या बैठकीला सरपंच प्रणया टेमकर, पारवाडी मंडळाचे अध्यक्ष सचिन परब, सुरेश ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम, लवू घाडी,अनुष्का गांवकर,समिती सदस्य जयप्रकाश परुळेकर, जगदीश पांगे,ग्रामस्थ प्रदिप केळकर, रवींद्र बागवे, पर्शुराम शेट्ये ,चंदू कदम,विकास साटम, समिर ठाकूर, कौस्तुभ केळकर, क्रूषी सहाय्यक मिथून खराडे, यांसह पारवाडी डोंगरेवाडी येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page