मसुरे /-
पळसंब ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुसज्य अशा ग्राम विलगिकरण कक्षाचे उदघाटन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शाळा पळसंब नं १ येथे करण्यात आले.
यावेळी जयेंद्र जाधव यांनी शिवराज्याभिषेक दीनाच्या शुभेच्छा देताना छ. शिवाजी महाराजांनी रयतेचा जाणता राजा बनून ज्या प्रमाणे आपल्या रयतेची काळजी घेतली त्याच प्रमाणे आपण आपल्या लोकांची काळजी घेऊया, गावात समता,बंधुता अबाधित ठेवत या संकटावर मात करूया.या साठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आपल्या सोबत आहेअसे प्रतिपादन केले.
पळसंब गाव हॉट स्पॉट ठरला असतानाही सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीतच रुग्ण संख्या निरंक करण्यात ग्राम सनियंत्रण समितीने यश मिळवले या बाबत सरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्राम समिती यांचे कौतुक असून कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजनेसाठी आपण प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास ग्रामविस्तार अधिकारी श्री पी डी जाधव, उपसरपंच श्री सुहास सावंत, ग्रामसेवक युवराज चव्हाण, सदस्य श्री चिंचवलकर, श्रीम सीमा चव्हाण,प्राणिता पुजारे, डॉ स्वप्नील भोगटे, जुवेकर मेडिकल चे श्री विपुल जुवेकर ,झोनल अधिकारी श्री गाड, सहाय्यक श्री घोटाळे,आरोग्य सेविका श्रीम पुजारे,आरोग्य सेवक श्री यादव,आशा सेविका श्रीम परब,मुख्या.श्रीम असरोडकर व इतर मान्यवर उपस्थीत होते.
या सेंटर मध्ये इतर सुविधांसह वाय फाय सह टीव्ही व्यवस्था करण्यात आली असून महिला व पुरुष असे दोन स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
या कोव्हिडं सेंटरसाठी पळसंब गावचे सुपुत्र श्री राजेश भंकाळ यांनी ५० पिपीई किट,१०० उच्च दर्जाचे मास्क,कल्याण डोंबवली चे महापौर मा श्रीम विनिता विश्वनाथ राणे यांनी १० बेड,प्रदीप परब यांनी २५ लिटर सॅनिटायझर,पळसंब पोस्टमन मांजरेकर यांनी वाफेच्या मशीन दिल्या. श्री दिनेश परब यांनी वाहतूक व पार्सल व्यवस्था सांभाळली.कोव्हिडं सेंटरसाठी ज्यांनी मदत केली तसेच कोरोना नियंत्रणासाठी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांचे सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण यांनी केले. श्री प्रमोद सावंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केलं तर आभार श्री गाड सर यांनी मानले.