बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…?

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…?

बांदा /-

बांदा – गडगेवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वजित कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे नाव आहे. सदर कामगार ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर यांच्याकडे भाड्याने राहत होता. त्याच्या सोबत पत्नी, मुलगी व मुलगा होता. दोन्ही मुले आज सकाळी जोरजोराने आपल्या वडिलांना हाक मारत होती. हे ऐकून मकरंद तोरसकर यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे तोरसकर यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विश्वजित खाली कोसळलेला निदर्शनास आला. यावेळी पत्नी व मुले दुसर्‍या खोलीत होती. त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी होती. विश्वजित याच्या छातीवर खोल जखमा आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञाताने त्याच्यावर खूनी हल्ला केल्याची शक्यता आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे सहकारी कर्मचारी समीर भोसले, अमोल बंडगर, संजय हुंबे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर हळदे, राजाराम कापसे, होमगार्ड विश्वजित भोगटे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. सावंतवाडी पोलीस उप अधीक्षक रोहिणी साेळंखे याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलीसांचे श्वानपथकही घटनास्थळी आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील काही वेळेतच घटनास्थळी येत आहेत. मयताच्या शरीरावरील जखमा पाहता विश्वजित याचा घातपात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. ोलीस तपासात अद्यापपर्यंत कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नाही पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करीत अाहेत. बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर घटनास्थळी उपस्थित होते. बांदा पोलीसात या घटनेची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. सदर घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

अभिप्राय द्या..