नवी दिल्ली /-
भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळासाठी होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात (एप्रिल 2020 – मार्च 2021) भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.
या आधी संस्थेने भारताची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी घटणार असा अंदाज वर्तवला होता. परंतु कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर मर्यादा आल्याचे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया पॅसिफिकचे अर्थतज्ज्ञ विश्रुत राणा यांनी सांगितले.
मार्च ते जून 2020 या कालावधीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था तब्बल 23.9 टक्क्यांनी घसरली. कोरोनाची जागतिक महामारी, तिला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाऊनमुळे खासगी क्षेत्रावर परिणाम झाला आहे.