महाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

महाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…


मालवण /-


तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली आहे. पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. नारळाचे, आंब्याचे, घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे चांगल्या पद्धतीने केले जातील. त्यानुसार शासन मदत जाहीर करेल. कोकणवासीयांनी विश्वास ठेवावा की महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितच दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डांटस, काका कुडाळकर, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, आगोस्तीन डिसोझा, पंचायत समिती सदस्य विनोद आळवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
सुरवातीस आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार श्री. पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयात भेट देत आढावा घेतला. यावेळी आमदार नाईक यांनी महावितरणला काही आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात समस्या भासत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोल्हापूरला लॉकडाऊन असल्याने हे साहित्य उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार श्री. पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. यानंतर श्री. पाटील यांनी धुरीवाडा परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
श्री. पाटील म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाच्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरातला तडाखा बसला. याचा जास्त फटका सिंधुदुर्गला बसला. वाऱ्याचा वेग प्रचंड होता. या वादळामुळे घरांवर झाडे पडून नुकसान झाले. मच्छीमारांचेही नुकसान झाले. सर्वात जास्त नुकसान हे महावितरणचे झाले. वीज खांब तुटले, तारा तुटल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. राज्य सरकारने या काळात काम करण्यासाठी टीम पाठविल्या असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरणला भेट देत आढावा घेतला. आता वीज खांब, तारा येत आहेत. अन्य साहित्य येथे इंडस्ट्री नसल्याने उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्याशी संपर्क साधत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी याबाबत कोल्हापूरच्या इंडस्ट्रीशी संपर्क साधून महावितरणच्या सहकार्याने हे साहित्य सिंधुदुर्गला उपलब्ध करून देऊ असे स्पष्ट केले आहे.
बारामती झोनचे मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे हे साहित्यही लवकरच उपलब्ध झाल्यावर येथील वीजपुरवठ्याची समस्या दूर होईल.
मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घेण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत. त्या अनुषंगाने मत्स्य अधिकाऱ्यांना तसेच सहकार विभागालाही आवश्यक सूचना आपण दिल्या आहेत. झाडावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अनेक वर्षानंतर झाड तयार होते. त्यानुसार पंचनामे होतील. झाडाच्या उत्पन्नानुसार मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली असून त्यानुसार वरिष्ठ स्तरावर चर्चा करून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करू असेही श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

अभिप्राय द्या..