मालवण /-


तौक्ते वादळामुळे मालवणसह वेंगुर्ला, देवगड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन- चार दिवसात पूर्ण होतील. मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. त्यामुळे आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग येथे दिले.
तौक्ते चक्रीवादळात तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग गावाला भेट दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवक्ते अरविंद मोंडकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक काँग्रेसचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष मंदार शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी तारी, तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, अभय शिरसाट, विजय प्रभू, माजी सभापती देवानंद चिंदरकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, बाळू अंधारी, गणेश पाडगावकर, सरदार ताजर आदी उपस्थित होते.
यावेळी पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी देवबाग येथील खाडी किनारी असलेल्या झाडे व खाडीचे पाणी घुसून नुकसानग्रस्त झालेल्या अरविंद खवणेकर यांच्या घराला भेट देत पाहणी केली. मंत्री वडेट्टीवार यांनी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्याकडून वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर देवबाग मोबारवाडी येथील समुद्राच्या उधाणात उदध्वस्त झालेल्या बंधाऱ्याची पाहणी केली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, गतवर्षीच्या वादळात सरकारने निकष बदलून मदत दिली. यावेळीही कोणालाही नाराज न करता मदत देणार असून याबाबत कॅबिनेटमध्ये विषय उपस्थित केला जाईल. मालवण, वेंगुर्ला, देवगड या तालुक्यामध्ये वादळाचा मोठा फटका बसला आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. कोकणवासीयांच्या मागे खंबीर उभे राहण्याची भूमिका मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाची आहे. त्यामुळे मदतीत हात आखडता घेतला जाणार नाही.
वादळात समुद्री उधाणामुळे देवबागचा संरक्षक बंधारा उदध्वस्त झाला असून समुद्री उधाणामुळे भविष्यात पूर्ण देवबाग गाव उदध्वस्त होऊन येथील ग्रामस्थांना मोठ्या संकटाला सामोरे गावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या कामासाठी तातडीची मदत करू, बंधाऱ्या प्रश्नी बंधाऱ्याशी संबंधित असणाऱ्या सर्व विभागांची तातडीने बैठक घेऊन बंधारा कामासाठी निधी देऊ, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. घरांच्या नुकसानी बाबत राज्य सरकारने मदत वाढविली आहे. नुकसानग्रस्त नौकांसाठी देखील मदत वाढविण्यात येईल, लोकांची मागणी लक्षात घेऊन निर्णय घेऊन मदत केली जाईल. मदतीत कोणतीही कमी होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page