कुडाळ /-
राज्यकर्ते फक्त वेंगुर्ले व मालवण मधील सागरी किनारपट्टी लगतच्या भागातच पहाणी दौरे करून मदत कार्य करीत असल्याने नुकसानग्रस्त इतर भागातील स्थानिक जनतेच्या भावना मात्र तीव्र आहेत.मच्छिमार वर्गासोबतच शेतकरी वर्गाचेही प्रचंड नुकसान होऊन देखील त्याकडे राज्यकर्त्यांकडून दुर्लक्ष केले जात नसल्याने लोक व्यथित झाले आहेत. मुळात सागरी किनारपट्टीच्या भागांप्रमाणे जिल्ह्यातील पश्चिम घाट नजीकचा परिसर,सह्याद्री पायथा,डोंगराळ भाग आदी नजीकच्या संपूर्ण गावांमध्ये शेती,बागायती,घरे अशा बाबतीत प्रचंड नुकसान होऊन देखील अद्याप महाराष्ट्र शासनाकडून मदतकार्यासाठी मार्गदर्शक सूचना पारित नसल्याने राज्य सरकार मागील वर्षीप्रमाणे अत्यल्प नुकसान भरपाई देऊन जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम करणार आहे अशी भावना जनतेमध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्यासोबतच महावितरणचे नियोजन शून्य कामकाज हे देखील जनतेच्या मनस्तापात अधिक भर टाकणारे ठरत असून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.एकूणच जिल्ह्यातील जनता या आपत्ती कार्यकाळात हतबल होऊन शासनाच्या मदत कार्याकडे आस लावून बसली आहे मात्र राज्यकर्ते नुसते पाहणी दौरे करत फोटोशूट करून जबाबदारीपासून पळ काढण्याचे काम करत आहेत अशी घणाघाती टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी आज कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.