वेंगुर्ला /-
सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव हा तरुणाईत मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे समाजाची व सरकारची जोखीम वाढलेली आहे.त्यातच तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केली जात आहे.त्याचा प्रादुर्भाव यापेक्षा अधिक व लहान मुलांमध्ये अधिक असण्याची शक्यता असल्याने सरकार व संबंधित आरोग्य खाते यांनी सावधगिरी व्यक्त केली आहे.त्याच धर्तीवर ग्रामपंचायत स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे गावात असलेल्या दुकान,व्यावसायिक,आंबा बागायतदार त्यांचे कर्मचारी यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी लेखी कळविण्यात आले आहे.ही बाब योग्य असली तरी प्रामुख्याने शासनाने त्या त्या ग्रा.पं. स्तरावर अशा व्यावसायिकांना प्राधान्यक्रमाने लस उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी काजू उद्योजक योगेश कुबल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.कारण मागील १५ महिन्यात फक्त ४ -५ महिनेच काम सुरु राहिल्यामुळे सर्व छोटे – मध्यम व्यावसायिक आधीच मेटाकुटीस आले आहेत.त्यामुळे योग्य वेळेत लस उपलब्ध करुन दिल्यास हा धोका कमी होईल व रोजगाराची सर्व आस्थापने सुरु राहून रोजीरोटीचा प्रश्न थोड्या प्रमाणात स्थिर राहील,असेही त्यांनी म्हटले आहे.