मालवण /-
क्यार वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज मंजूर होऊन वर्ष होत आले तरी लाभार्थी गरीब मच्छीमारांच्या खात्यावर अद्यापपर्यंत रक्कम जमा झाली नसल्याने १० मे पासून मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी तहसीलदार व मत्स्य विभागाला निवेदनाद्वारे दिला होता. धुरी यांच्या या इशाऱ्यानंतर मत्स्य विभागाने १४ मे पर्यंत सर्व मत्स्य सहकारी संस्थांच्या लाभार्थी मच्छीमारांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिल्याने मेघनाद धुरी यांनी उपोषण स्थगित केले आहे. मच्छीमारांना क्यार व महाचक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही. या मच्छीमारांना शासनाकडून विशेष आर्थिक सहाय्य मंजूर झाले आहे. मात्र येथील सहायक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील सुमारे चार हजाराहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना ही मदत मिळावी यासाठी येत्या १० मे पासून सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला होता. राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून मच्छीमारांना विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. याबाबतची तरतूदही सहायक मत्स्यव्यवसाय विभागाकडे करण्यात आली आहे. हे विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्याबाबत शासनाने जिल्हा लाभार्थी निवड व वितरण समितीची सभा ८ एप्रिलला झाली. त्यात जिल्ह्यातील मच्छीमारांना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असताना ज्या मच्छीमारांना विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले त्यांच्या खात्यावर अद्यापही ही मदत जमा झालेली नाही. कोरोना काळात मच्छीमारांना जर आर्थिक मदत मिळत नसेल त्याचा उपयोगच काय? असा प्रश्न धुरी यांनी उपस्थित केला होता. शासनाने मंजूर केलेल्या आर्थिक पॅकेज मधून नौका धारकांना मदत वितरित करण्यात आली. मात्र लाभार्थी निवड व वितरण बैठक होऊन एक महिना झाला तरी लाभार्थींची तपासणी व खातरजमा करण्यास मत्स्य विभागाला एक महिना लागतो ही हास्यास्पद गोष्ट आहे अशी टीका मेघनाद धुरी यांनी करत गरीब मच्छीमार एक वर्ष मदतीची आशेने वाट पाहत आहेत. मात्र मत्स्य अधिकाऱ्यांची मच्छीमारांना मदत मिळवून देण्यात स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे मच्छीमारांना पॅकेजचा लाभ मिळण्यासाठी आपण घेतलेला उपोषणाचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगितले होते. मेघनाद धुरी यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज मत्स्य विभागाने मच्छीमारांना अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले. राज्यातील सागरी मच्छिमारांना क्यार व महा चक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नसल्याने विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार ३.४६ कोटी रक्कम मच्छिमार लाभार्थी खाती जमा करण्यात आली आहे. मत्स्य कार्यालयास जिल्ह्यातील काही मत्स्य सहकारी संस्थांचे परिपूर्ण प्रस्ताव व सॉफ्ट कॉपी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रस्तावाची छाननी झाली असून निधी वितरण करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या मत्स्य सहकारी संस्थांचे मंजूर परिपूर्ण प्रस्ताव व सॉफ्ट कॉपी प्राप्त झाल्या आहेत अशा सर्व मत्स्य सहकारी संस्थांचे लाभार्थी यांचे खाती दि. १४ मे पर्यंत मंजूर अनुदान जमा करण्यात येणार आहे असे आश्वासन देत उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी धुरी यांना लेखी पत्राद्वारे केले आहे. त्यामुळे मेघनाद धुरी यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.