कणकवली /-
कोविड १९ च्या दुसर्या लाटेत देश झपाट्याने अडचणीत सापडला आहे. त्यात वैद्यकीय सुविधांचा अपुरा पुरवठा जाणवत आहे. या अपुऱ्या पुरवठ्यात ऑक्सिजन पुरवठ्याचा अभाव ही मुख्य समस्या आहे. सगळीकडेच ही समस्या जाणवत असताना महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आॕक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागतोय. त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय पातळीवर ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय पातळीवर यापूर्वीच विविध उपाययोजना करून कोरोना संसर्ग रोखण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला असून आॕक्सिजनअभावी अनेकांना जीवास मुकावं लागतंय. सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूरहून आणल्या जाणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरवर अवलंबून आहे. सिलेंडर रिफिलिंगसाठी प्रवासखर्च धरून १२ तास लागतात. त्यामुळे इतका वेळ रुग्ण आॕक्सिजनअभावी तडफडून जातो. जिल्ह्यात दोन पीएसए प्लांट आहेत. परंतु सद्यस्थितीत ऑक्सिजनची मागणी त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला १०० ऑक्सिजन केंद्रे आणि त्वरित भरलेले जंबो किंवा ड्युरा सिलिंडर्स तातडीने उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी कोकणचे सुपुत्र खासदार सुरेश प्रभू यांनी वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.