मालवण /-
मालवण शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत असून होणारी गर्दी पाहता ती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग येथील लोकांना लस घेण्यासाठी सोयीस्कर वेगळी जागा उपलब्ध होईल या हेतूने वायरी येथे लोकनेते आर जी चव्हाण मंगल कार्यालयाची जागा लसीकरण साठी उपलब्ध करून देण्याची तयारी मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण यांनी दर्शवली असून याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी होणाऱ्या गर्दी मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. हे लक्षात घेऊन वायरी येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. आप्पा चव्हाण यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील यांच्याशी संपर्क साधून वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगलकार्यालयाची जागा लसीकरणसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा होईल त्यावेळी खासगी इमारतीत हा उपक्रम राबविण्याची शासनाची मान्यता असेल तर आठवड्यातून एक- दोन दिवस मोफत वापरासाठी देण्याची तयारी चव्हाण यांनी दर्शवली आहे. त्यामुळे वायरी शहरी व ग्रामीण भागातील तसेच देवबाग, तारकर्ली भागातील लोकांना अंतर जवळ असल्याने वाहतूकीचा खर्च व वेळेची बचत होईल तसेच जागा प्रशस्त असल्याने सोशल डिस्टन्स चा प्रश्न सुटून गर्दीमुळे होणारा संसर्गही टळेल असेही आप्पा चव्हाण यांनी म्हटले आहे.