कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगेट्राऊट (इंगेश) रुग्णालय येथे डॉ. जी.टी. राणे यांनी कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले. याठिकाणी अत्यावश्यक सोयी सुविधायुक्त नवीन १० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा तसेच रुग्णालयाची पाहणी करण्यात आली व आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कुडाळ तालुक्यात खाजगी कोविड सेंटर नसल्याने जिल्हयातील अन्य ठिकाणच्या खाजगी कोविड सेंटर मध्ये कुडाळच्या नागरिकांना जावे लागत होते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी डॉ. जी. टी. राणे यांच्याशी कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आजपासून हे कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. डॉ. जी.टी. राणे यांनी या रुग्णालया बरोबरच शासकीय कोविड सेंटर मध्ये देखील सेवा देणार असल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून याठिकाणी लवकरच ऑक्सिजन बेड सुध्दा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या आहेत.
याप्रसंगी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, डॉ. जी. टी. राणे, डॉ. नागेश पवार, इंगेट्राऊट (इंगेश) रुग्णालय ट्रस्टचे प्रकाश नेरुरकर, सुधाकर नाईक, नेरूर सरपंच शेखर गावडे, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, उपसरपंच समद मुजावर, रूपेश पावसकर, मंजूनाथ फडके, सुभाष फडके, गोपाळ सामंत, दत्ता देसाई, विजय लाड आदी उपस्थित होते.