मालवण/-
मालवण येथील अ. शि. दे.टोपीवाला हायस्कुलच्या १९८६ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ASD- 86 सोशल फाऊंडेशन तर्फे प्रशालेतील दोन गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या.
ASD -86 सोशल फाऊंडेशनतर्फे टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रशालेतील इयत्ता आठवी मधील रिया जामसंडेकर व तन्वी पराडकर या सर्जेकोट गावातून येणाऱ्या गरजवंत विद्यार्थीनींना शाळेत येण्यास होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सोशल फाऊंडेशन तर्फे दोघांनाही सायकल प्रदान करण्यात आल्या. टोपीवाला हायस्कुल मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थिनींना प्रशालेचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे व संस्था सचिव विजय कामत यांच्या हस्ते या सायकल सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक अवसरे व सचिव कामत यांनी सोशल फाऊंडेशनचे आभार मानत माजी विद्यार्थ्यांच्या शाळेप्रति असलेल्या जाणिवेचे व कार्याचे कौतुक केले. तर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरी चव्हाण यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन यापुढेही आवश्यक ते सहकार्य करत राहू असे सांगितले.
यावेळी सोशल फाऊंडेशनचे सचिव किशोर नाचणोलकर, उपाध्यक्ष सिमसन फर्नांडिस, अनिता केळुसकर, दत्ता तांडेल, नाना परब, अंकुश गोसावी, सुहास खराडे, आनंद मयेकर, राजेश कुशे, सुरेंद्र सकपाळ आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.