मालवण/-

मालवण शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, व्यपारी यासह घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क होत रुग्णांच्या थेट संपर्कातील सर्वच व्यक्तींची स्वाब तपासणी करावी. कोरोनाची वाढती साखळी तोडून मालवण शहर पुन्हा एकदा कोरोना मुक्त करूया. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णाला तात्काळ उपचार मिळाले पाहिजे. कोणत्याही आरोग्य सुविधांची कमी निर्माण झाल्यास त्या शासन स्तरावरून अथवा पालिका स्तरावरून तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील. असेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले. तर शहरातील ज्या भागात रुग्ण सापडले आहेत त्या परिसरातील सर्व घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी सोमवार १४ सप्टेंबर पासून करण्याचे आदेश नगराध्यक्ष यांनी आरोग्य विभागास दिले आहेत. नागरिकांनीही ताप अथवा अन्य कोणतीही लक्षणे असल्यास त्याबाबत माहिती लपवू नये. असे आवाहनही करण्यात आले आहे.

मालवण शहरातील कोरोना स्थिती जाणून घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतला. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत, पालिका अभियंता सोनाली हळदणकर उपस्थित होते.

मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटर येथे सध्या शहर व ग्रामीण असे २० रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांना आवश्यता भासल्यास मालवण ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा आहे. अधिक उपचारासाठी ओरोस येथे स्वतंत्र व्यवस्था असून त्याठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे. आरोग्य यंत्रणा प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवून आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वाब तपासणीही जलद गतीने होत आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.

स्वाब तपासणी केंद्राची उभारणी

मालवण पालिकेच्या अल्पबचत सभागृहात स्वतंत्र वातानकुलीत यंत्रणा उभारणी करण्यात येत असून या ठिकाणी कोरोना स्वाब तपासणी केली जाणार आहे. याठिकाणी काम सुरू असलेल्या यंत्रणेचा आढावा घेत डॉक्टर पाटील यांच्या सूचनेनुसार उभारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष यांनी बांधकाम विभागास दिले. तर नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने काही आवश्यक बदल सुचवले आहेत. लवकरच काम पूर्ण करून स्वाब तपासणी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

‘आपत्कालीन कोरोना योद्धा टीम’

कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात पोलीस, आरोग्य या प्रमुख यंत्रणेतील कर्मचारी बाधित होत आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. अश्या स्थितीत शहरातील नागरिकांचा आरोग्य तपासणी व नोंद सर्वे करण्यासाठी तसेच एखाद्या आपत स्थितीत आरोग्य व पालिका प्रशासनासोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत पालिकेच्या ‘आपत्कालीन कोरोना योद्धा टीम’ मध्ये सहभागी व्हावे. सर्व सुरक्षा सुविधा पालिकेच्या वतीने दिल्या जातील. तरी इच्छुकांनी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका तसेच आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page