कुडाळ /-
श्री क्षेत्र नेरुर कलेश्वर मंदिर येथील महाशिवरात्री उत्सव रथोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने स्थानिक लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.या वर्षींचा महाशिवरात्र उत्सव दिनांक ७ मार्च २०२१ ते ११ मार्च २०२१ या कालावधीत साजरा होणार असुन यामध्ये केवळ धार्मिक विधी व पारंपारिक आदि कार्यक्रमाचा समावेश केलेला असुन इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.
मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या सुचनेनुसार या वर्षीचा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे.देवस्थानच्या आवारात कोणतेही स्टॉल दुकाने लावण्यास देवस्थान समिती परवानगी देणार नाही.तसेच उत्सवाच्या काळात दरदिवशी मंदिर व मंदिर परिसर सॅनीटायजरचा वापर करुन निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.तसेच थर्मल गनचा वापर करुन प्रत्येक व्यक्तीचे तापमान तसेच ऑक्सिमिटरने ऑक्सिजन तपासून मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.सर्व भाविकांना चेहरेपट्टी (मास्क) परिधान करुनच मंदिरामध्ये यायचे आहे. NO MASK NO ENTRY चा अवलंब करण्यात येणार आहे.तसेच दर्शनासाठी रांगेत अंतर ठेवुनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.तरी महाशिवरात्र उत्सव व्यवस्थीत पार पाडणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन.श्री.प्रदीप जयराम नाईक अध्यक्ष देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांनी केले आहे.