प्रत्येक जिल्ह्यात नृत्य संमेलनाचा ठराव
सिंधुदुर्गात राबविणार ‘एक नृत्यमय घर एक सदस्य’ मोहीम
कुडाळ /-
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नृत्यालय असावे या मागणीसह नृत्यकर्मींच्या प्रश्नांसाठी सर्व नृत्यकर्मीनी एकत्र शासनाकडे पाठपुरावा करावा असा निर्धार अलीकडेच कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य नृत्य परिषदेच्या कोल्हापूर विभागीय संमेलनात करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नृत्य चळवळ वाढविण्यासाठी एक नृत्यपूर्ण घर एक सदस्य हि मोहीम हाती घेल्याचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राहुल कदम यांनी यांनी यावेळी स्पष्ट केले.
अलीकडेच १७ जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथील नृत्य परिषदेच्या विभागीय कार्यालयाच्यावतीने राम गणेश गडकरी सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूरसहित सात जिल्ह्यातील नृत्य प्रेमी आणि नृत्य दिग्दर्शक सहभागी झाले होते. संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे शुभहस्ते व डॉ स्वागत तोडकर व डॉ प्रवीण कोडोलीकर यांचे उपस्थिती मध्ये झाले. यावेळी नृत्यपरिषदच्या वेबसाईटचे उद्घाटन ही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या वेळी भावी संकल्पना व उपक्रम यांच्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पंकज चव्हाण यांची विभाग सचिव म्हणून तर महेश पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक आखाडे, तसेच सिंधुदुर्गच्या सागर सारंग यांची विभागीय सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. रोहित मन्दृलकर व प्रज्योत सोहनी यांची पाश्चात्य अभ्यासक्रम समितीवर निवड करण्यात आली. दुपार सत्रात भुपेश मेहेर, जतीन पांडे, दीपक बिडकर, डॉ विनोद निकम यांची व्याख्याने झाली ज्यातून नृत्यकर्मी ना एक वेगळी दिशा मिळाली.
प्रत्येक जिल्ह्यात नृत्यकर्मीना सादरीकरणासाठी एक नृत्यालय असावे, जिथे नृत्यविषयक कार्यक्रम सादरीकरणसाठीच्या सुविधा मिळाव्यात, ग्रंथालय व कार्यशाळाची सोय असावी या पद्धतीने नृत्यालयचे नियोजन आहे. हा ठराव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला. शास्त्रीय, वेस्टर्न, लोकनृत्य यांचे अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती देखील ठरविण्यात आली.
यावेळी झालेल्या परिसंवादमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष संतोष माने (सांगली), राहुल कदम (सिंधुदुर्ग), अमित कदम (रत्नागिरी), महेश निकम्बे (सोलापूर), दिपक बिडकर (कोल्हापूर) यांनी आपले विचार मांडले. उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे यांनी केले. अत्यंत दिमाखात व कोल्हापूरच्या परंपरेला साजेशा या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा नृत्य परिषदच्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.