सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह कोकणात ग्रा.पं. निवडणुकीतील यशाची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल..

सिंधुदुर्ग/-

ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांची भाजपाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीची विभागीय बैठक मुंबई येथील भाजपा कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर सोपवली होती. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी भाजपाचे अस्तित्व नगण्य होते. कार्यकर्त्यांची मजबूत फळीही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ३०१ जागा निवडून आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाने मिळविलेल्या उत्तुंग यशाची दखल म्हणून माजी खासदार निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page