मुंबई: अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले  यांचे शनिवारी सकाळी गोव्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यात गेले होते. यावेळी हृद्यविकाराच्या झटक्याने रावले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

आज संध्याकाळी मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आणले जाईल. यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक
मोहन रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मोहन रावले यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. ते विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते. याच संघटनेच्या माध्यमातून मोहन रावले यांनी आपले नेतृत्त्व प्रस्थापित केले. शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर मोहन रावले यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते पाच टर्म दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार होते.

रावले हे बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात लोकसभेत उपस्थित न राहिल्यामुळे मोहन रावले यांनी बाळासाहेबांचा रोष ओढावून घेतला होता. त्यामुळे नंतरच्या काळात मोहन रावले यांचे शिवसेनेतील महत्त्व कमी होत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते जवळपास राजकीय अज्ञातवासात होते.

मोहन रावले अखेरपर्यंत परळ ब्रँड शिवसैनिक राहिले- राऊत
मोहन रावले यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही शोक व्यक्त केला. कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त, शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. त्याला विनम्र श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

गिरणी कामगाराचा मुलगा ते खासदार
मोहन रावले यांच्या निधनानंतर मुंबई डबेवाला असोशिएशनकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकसभेचा खासदार असा प्रवास मोहन रावले यांनी केला. त्यांच्या जाण्याने कामगार नेत्याचा अस्त झाला आहे. अशा या गिरणी कामगारांच्या नेत्यांस डबेवाला कामगारांची भावपूर्ण श्रध्दांजली अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page