सिंधूदुर्गनगरी /-
जिल्ह्यात २४७ पैकी २०४ शाळा सुरु झाल्या आहेत. ही टक्केवारी ८० एवढी आहे. मात्र, एकूण ४२ हजार ४२४ मुलांपैकी १२ हजार ७६७ मुलेच शाळेत दाखल झाली आहेत. एकूण ३२ टक्के मुले शाळेत येत आहेत. मुलांची टक्केवारी गावोगावी एसटी नसल्याने वाढत नाही, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यानी शिक्षण समिती सभेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला सदस्य सुधीर नकाशे, संपदा देसाई, राजन मुळीक, प्रभारी शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्यासह तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिनंदन व शोक ठराव घेण्यात आले. यावेळी सभागृहात जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या किती शाळा सुरु झाल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना कडूस यानी, जिल्ह्यात शाळा सुरु होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. पण विद्यार्थी दाखल होण्याचे प्रमाण ३२ टक्के आहे. जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे एसटीने प्रवास करणारे आहेत. परंतु त्यांना गावातून येणारी शाळेच्या वेळेत एसटी नाही. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली आहे, असे सांगितले.