भारतीय रेल्वेकडून १ लाख ४० हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बऱ्याच जणांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. याच दरम्यान, सरकारने आशेचा किरण दाखवला आहे. भारतीय रेल्वेकडून १ लाख ४० हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. रेल्वे विभागाने ११ डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी २.४४ लाख उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
प्रक्रियेचा पहिला टप्पा आजपासून सुरु
आजपासून रेल्वे भरतीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निक पॉप्युलर कॅटेगरीज पदांसाठी २८ डिसेंबर ते मार्च २०२१ या काळात परीक्षा होणार आहेत.
तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परिक्षेचा कालावधी साधारण एप्रिल २०२१ ते जून २०२१ असा असणार आहे.
परीक्षेसाठी रेल्वेकडून विशेष खबरदारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून रेल्वे परीक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान तपासल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.
या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार आहे. जेणेकरून उमेदवार सहजपणे त्याठिकाणी पोहोचू शकतील. मात्र, काही उमेदवारांना दुसऱ्या राज्यातही परीक्षा केंद्र मिळू शकते. त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या जातील. यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना सहकार्य करण्याची विनंती रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.