✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भूगोल विभागप्रमुख प्रा. संभाजी शिंदे यांनी मांडले.जी-20 अंतर्गत कणकवली महाविद्यालयातील भूगोल विभाग,आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने वेबीनारचे आयोजन केले होते. या वेबिनारच्या अध्यक्ष स्थानीकॉलेजचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते.
जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट म्हणजे ‘जी-२०’ होय. विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे. १ डिसेंबर २०२० रोजी, भारताने इंडोनेशियाकडून जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले, ही देशासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. सर्वांच्या कल्याणासाठी, जागतिक समस्यांवर काही व्यावहारिक उपाय शोधण्याच्या दृष्टीने भारताची ही अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून हे करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘जग हे एक कुटुंब’ या तत्वाचे पूर्ण दर्शन घडणार आहे. प्रोफेसर डॉ. संभाजी शिंदे म्हणाले, सध्या मानव जे विविध ऊर्जास्रोत वापरत आहे त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकावर होत आहे. आपली आतापर्यंतची जीवनशैली मुख्यत्वे करून पारंपरिक ऊर्जेवर आधारलेली आहे. यामुळे मानवाचे राहणीमान उंचावून जीवन सुखकर झाले, परंतु या ऊर्जानिर्मिती व त्याच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कित्येक सजीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. तसेच हवामान बदल, तापमानात वाढ, अनियमित पर्जन्यमान आणि बदलतं ऋतुमान यामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळत चालेले आहे. तसेच पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित असल्यामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या, ऊर्जेची वाढती मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. तसेच ऊर्जा स्त्रोताचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी विद्यार्थ्यांना उदाहरणासह मार्गदर्शन केले. यावेळी कणकवली कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी या वेबिनारचे प्रास्ताविक केले. ग्रामीण विकास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी स्वागत आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. बाळू राठोड यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रविण कडूकर यांनी केले तर आभार डॉ. तेजस जयकर यांनी मानले. या वेबिनारमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक मिळून १६० अभ्यासक उपस्थित होते.
