✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
शिक्षकांच्या पेन्शन बाबत लवकरच सकारात्मक विचार करणार आणि
शिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही, अन् टाकू देणार नाही, मोकळ्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम झाले पाहिजे, त्यामुळे अतिरिक्त कामे देणार नाही. तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमची आहे.शिंदे-फडणवीस सरकार तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान राज्यात लवकरच नव्याने ३० हजारहून अधिक शिक्षकांची तर ४८६० केंद्रप्रमुखांची पदे भरली जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाला आकार देण्यासाठी काम सुरू आहे.शाळाबाह्य मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आज वेंगुर्ला येथे पार पडले. यावेळी उद्घाटन प्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, माजी राज्याध्यक्ष काळोजी बोरसे-पाटील, सुधीर तेली, ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी संघटनेचे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले,वेंगुल्यासारख्या निसर्ग रम्य वातावरणात आपण त्रैवार्षिक अधिवेशन घेतले आहे.ही कौतुकाची बाब आहे.या ठिकाणी अधिवेशन आयोजित केल्यामुळे दोन दिवसीय अधिवेशन झाले. आणि पर्यटनही झाले. परंतु या ठिकाणी आलेल्या शिक्षकांनी चांगले काहीतरी घेऊन जावे, गुरु या संकल्पनेला महत्त्व आहे. त्यांना समाजात आदराचे स्थान आहे. त्यामुळे भावी पिढी घडवण्यासाठी गुरुने प्रयत्न करावा. देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी करावे, हे करत असतानाच तुम्हाला भेडसावत असलेले प्रश्न सोडण्याची आमची जबाबदारी आहे.
शिक्षकांनी ज्ञानाच्या क्षेत्रात मोठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी शिक्षकांची जागा कोणीच घेत नाही, घेऊ शकत नाही, आणि घेताही येणार नाही. त्यामुळे कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरी गुरूला तितकेच महत्त्व आहे. येणाऱ्या काळात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार रात्रंदिवस काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व त्रुटी दूर करण्यास हे सरकार महिलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मराठी शाळेत शिकलेला एक सर्व सामान्य कार्यकर्ता अगदी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसला हे थोडक्यात आहे. त्यामुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येथील शिक्षकांनी विद्यार्थी घडवणे गरजेचे आहे. सद्यस्थिती लक्षात घेता कोणी किती सांगितले, तरी मराठी शाळांना चांगले दिवस आले आहेत. अनेक लोकांचा कल हा मराठी शाळांकडे आहे. आपली मुले मराठी शाळे शिकावीत यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसतात.त्यामुळे फायदा शिक्षकांनी घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
तसेच येणाऱ्या काळात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पेन्शन सारखा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी येत्या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ते पुढे म्हणाले, चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरु आहे.तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारतोषिक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याच निर्णय तात्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हे ज्ञान दानाचं काम करत असतो. पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे.
राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये देखील शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालकांचा व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्स मध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचं मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अभिनंदन करतो. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तरुण पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचं योगदान फार महत्वाचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नविन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिले जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारचा नविन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्याने दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. असेही ते शेवटी म्हणाले…
प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागणी केली. यावेळी आबा शिंपी यांच्या स्वराज्याचं दीपस्तंभ आणि संदीप मगदूम याच्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीस यावेळी वेंगुर्ला शिक्षक वृंद यांनी स्वागत गीत गायन करुन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
