शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैसोयींवर तात्काळ उपाययोजना करा. मनसेची मागणी..
लोकसंवाद /- ओरोस.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि सेवा वितरण करण्यासाठी शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (DBT) कार्यपद्धती अंमलात आणण्यात आलेली आहे. मात्र मागील महिनाभरापासून महाडीबीटी पोर्टल वरील तांत्रिक बिघाडांमुळे व सेवा बदलांमुळे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अवजारे खरेदी केलेनंतर योजना अनुदान लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बेसड़् लॉगिन वरून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केले होते, त्यांच्या अर्जांना लॉटरी सोडत कार्यपद्धतीद्वारे मंजुरी देखील मिळाली मात्र आता प्रत्यक्षात कृषी अवजारे खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीचे कागदपत्र Maha DBT पोर्टलवर सादर करण्यासाठी प्रचंड अडचणी येत असून शेतकऱ्यांना नाहक मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.महाडीबीटी पोर्टल वरून आता आधार बेस लॉगिन पद्धत बदल करून यूजर आयडी प्रणालीद्वारे प्रोफाईल निर्मिती करून अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती अमलात आणली गेली आहे.त्यामुळे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आधार बेस पद्धतीद्वारे अर्ज सादर केले होते त्यांना अवजारे खरेदी केल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी तांत्रिक अडचणीं येत असून असेच काही दिवस चालू राहिल्यास शासन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पूर्वसंमती मिळाल्यापासून ३० दिवसांचे आत खरेदीचे कागदपत्र पोर्टलवर सादर न केल्यास शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्वसंमती मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांनी याबाबत मनसेकडे व्यथा मांडलेल्या असून कृषी विभागाने यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज असून ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती द्वारे शेती अवजारे खरेदी केलेली आहेत व ज्यांना आता महाडीबीटी पोर्टल वरील तांत्रिक बदलांमुळे कागदपत्र सादर करण्यास अडचणी येत आहेत अशा शेतकऱ्यांचे आपले स्तरावरून ऑफलाइन पद्धतीद्वारे कागदपत्रे भरणा करून घेत Maha DBT पोर्टल नियंत्रण कशास याबाबत अवगत करून तात्काळ लाभ मिळवून द्यावा अशी विनंती मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तालुका कृषी अधिकारी कुडाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे,माजी उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, सुंदर गावडे,वैभव धुरी ,शेतकरी रामचंद्र घाडी आदी,कृषी पर्यवेक्षक श्री चव्हाण आदी उपस्थित होते.