सिंधुदुर्ग /-
कुडाळ येथे एका खाजगी प्रॉपर्टीमध्ये सापडलेल्या गोवा बनावटीच्या बेवारस दारू साठ्यावर कुडाळ पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून सदरील मुद्देमाल आपसात वाटून घेतला असल्याच्या बातम्या सोशल मीडिया न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध होऊन जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या संदर्भात सखोल चौकशी करून कुडाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कडक व कायदेशीर कारवाई करावी याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांना मनसे नेते व राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी दिले.
श्री. परशुराम उपरकर निवेदनात म्हणतात की, सदरील वृत्तानुसार माहिती घेतली असता काही पत्रकारांना नागरिकांकडून माहिती अशी मिळाली की, दि. १२/१२/२०२१ रोजी २०० बॉटल व काही बॉक्स दारू संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी कुडाळ येथील हॉटेल गुलमोहर शेजारील श्री. सरमळकर यांच्या जागेत सापडण्याची घटना घडली होती. सदर साठा हा लगतच कुडाळ तालुक्यात ट्रकच्या ट्रक गोवा बनवाटीच्या दारूचा साठा आणून दारू विक्री करणाऱ्याची दारू अश्या अडगळीच्या ठिकाणी टाकल्याचे पोलीस स्टेशनला काही नागरिकांनी दूरध्वनीवरून सांगितले होते.
त्या गुन्ह्याची नोंद त्याचवेळी अनक्लेम गुन्हा म्हणून दाखल करण्याची गरज होती, परंतु ती त्याचवेळी न करता काही अधिकाऱ्यांनी सदरील बॉटल व बॉक्स आपसात वाटून घेतले. कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात ट्रकच्या ट्रक दारूचा साठा माहिती असूनही पोलीस त्यावर करावाई करत नाहीत. याबाबत सदर जुनी घटना काही जनतेकडून व पत्रकारांकडून सोशल मिडीयावर पसिद्ध झाल्यानंतर सदर घटनेचा गुन्हा १९/०४/२०२२ रोजी दुपारी २.०० वाजता ३० बाटल्या दाखवून त्याची किंमत सुमारे ५२६०/- दाखविण्यात आलेली आहे. सदर बाजूला असलेल्या प्रॉपर्टीमध्ये अज्ञान इसमानाने बेकायदेशीर विक्री करिता माल बेवारस स्थितीत ठेवलेला असेल तर त्याचवेळी अनक्लेम गुन्हा रजिस्टर ०/२१ दि. १३/१२/२०२१ रोजी तपास करून तपासात निष्पन्न झाल्यास त्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी प्रतिबंध अधिनियम ६५ ई प्रमाणे करवाई करण्याची गरज होती. पण अश्याप्रकारे गुन्हयामध्ये व्यक्ती सापडलेली नसताना पोलीस मॅन्यूअल व पोलीस अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद करता येत नाही, परंतु तरीही अधिकाऱ्यांनी स्वतःला वाचवण्याकरिता दि. १९/०४/२०२२ रोजी गुन्हा क्रमांक ७०/२०२२ दारूबंदी अधिनियम ६५ नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध नियमबाह्य गुन्हा दाखल केल्याचे समजते.
सदर गुन्हा दाखल करण्याचे कारण असे की, काही व्यक्तीने माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केल्याने अडचणीत येऊ नये म्हणून गुन्हा दाखल करून कमी मुद्देमाल दाखवून अनक्लेम गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपी किंवा संशयित आरोपी असताना गुन्हा दाखल केला आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती करवाई करण्यात यावी. असे श्री. उपरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, ओरोस सरपंच आप्पा मांजरेकर, भाई सावंत, प्रथमेश धुरी, वैभव धुरी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
