मालवण /-

मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्नी स्मृती कांदळगावकर उपस्थित होत्या. ते म्हणाले, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मालवण पालिकेत प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर नागरिकांनी आपल्याला बसवल्या बद्दल आपण जनतेचे आणि शिवसेनेने आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे.

कुठलीही राजकीय स्पर्धा शह-काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षाच्या कालावधीत शहराचा विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न केले. हे करत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पण हा राजकारणाचा एक भाग म्हणून याला उत्तर प्रत्युत्तरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे वेळ फुकट न घालवता जास्तीत जास्त शहराच्या विकास कामांकडे लक्ष दिले. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होणार आणि काम करणाऱ्या कडून चुका होणार हे सर्वश्रुत आहे. पण हे करत असताना जनतेची आणि माझ्या पक्षाची मान खाली जाईल असे कोणतेही काम मागील पाच वर्षात केले नाही. पालिकेत राजकीय विरहित काम करताना एक दोन वेळा सभागृहात मतदानाचे ठराव वगळता मागील पाच वर्षात सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यश आले. विरोधकांच्या प्रभागात पण लाखो रुपयांची कामे करण्यात आली आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली.

रस्ते, गटार स्वच्छता या मूलभूत सोयी बरोबरच मालवणचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यामध्ये रॉक गार्डन येथे डेकोरेटिव्ह लाईट, म्युझिकल फाऊंटन, चिवला बीच येथे डेकोरेटिव्ह लाईट, आडारी गणपती मंदिर सुशोभीकरण, हॉटेल सायबा नजीक सुशोभीकरण, मालवण नगरपरिषद आणि त्याचा परिसर सुशोभीकरण, पर्यटकांना उपयुक्त असे दिशादर्शक फलक, बायो टॉयलेट, मामा वरेरकर नाट्यगृह येथे सुसज्ज असा एसी मल्टीपर्पज हॉल, अग्निशमन इमारत, सुसज्ज अशी भाजी मंडई, नगरपालिका सफाई कामगार यांच्यासाठी बीओटी तत्त्वावर निवास व्यवस्था ही कामे करण्यात आली. बंद असलेल्या भुयारी गटार योजनेला शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊन ते काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. मालवणच्या पाणी योजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी रुपयांची नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली. लवकरच त्याला अंतिम मंजुरी प्राप्त होणार आहे.

कोकणातील पहिल्याप्रथम २५ कोटी रुपयांचा मत्स्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी अंतिम मंजुरीसाठी सादर आहे.अशा प्रकारे गेल्या पंधरा वर्षात झाली नसतील एवढी कामे या पाच वर्षात करण्यात आली. अर्थात यासाठी शासन दरबारी मंजुरी आणि निधी आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याशिवाय शक्य झाले नसते ही वस्तुस्थिती आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाचे संकट तोक्ते वादळामुळे विकासकामांना अनेक अडचणी आल्या. कामे या मुदतीत पूर्ण करता आली नाही हे नाकारता येणार नाही. पण सद्यस्थितीत बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत आणि काही कामे पूर्णत्वाकडे आहेत. टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली. त्यामुळे मागील पाच वर्षात बिलो टेंडर मंजुरीतून जवळपास ६० ते ७० लाख रुपयांची शासनाच्या निधीची बचत करण्यात आली. मालवणच्या विकासकांना मालवण पालिकेतर्फे पूर्णपणे सहकार्याची भूमिका ठेवल्यानेच आज मालवण मध्ये अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि मालवणच्या सौंदर्यामुळे भर पडली आहे.

मात्र मागील पाच वर्ष मालवणचा विकास हा एक अजेंडा घेऊन काम करत असताना माझा कुटुंबाकडे आरोग्याकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य होईल असे वाटत नसल्यानेच या कारणास्तव आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.माझ्या कालखंडात मालवणच्या विकासासाठी पक्षांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मालवण वासीयांच्यावतीने मी त्यांचा ऋणी राहील.यापुढेही मालवण वासियांचे कुठले प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल.चांगल्या कामाचे श्रेय तर मला मिळत असेल तर काम करताना नकळत काही चुका झाल्या असतील तर झालेल्या चुकांची आणि त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझीच असेल असेही कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page