देवगड /-

तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकणाला सर्वाधिक बसला. कोकणातील मच्छिमार, आंबा बागयतदार व शेतक-यांचे यात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त मच्छिमार व शेतक-यांना आतापर्यंत ठाकरे सरकारने नुकसान भरपाई दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हित शेतकऱ्यांची व्यथा व शेतकऱ्यांची नुकसानी जाणून शेतकऱ्यांचा फायदा करुन देणारे हे ठाकरे सरकार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. देवगड येथील तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना धनादेश सुपुर्त करतेवेळी ते बोलत होते.

देवगड मच्छिमार लिलाव सेंटरच्या शेडमध्ये तौक्ते चक्रीवादळामधील नुकसानग्रस्त लाभार्थी मच्छिमारांना धनादेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाध्यक्ष संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, नंदुशेठ घाटे, महिला आघाडी प्रमुख निलम सावंत-पालव, जान्हवी सावंत, तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, उपतालुका प्रमुख बुवा तारी, विभाग प्रमुख तुषार पेडणेकर, शहर अध्यक्ष संतोष तारी तसेच मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी व मच्छिमार बांधव उपस्थित होते.

तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. या दौ-यामध्ये नुकसानग्रस्त भागाची व मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रशासनाला वस्तुस्थितीनुसार तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवून ते शासनाकडे सादर करण्यासाठी देखील सांगण्यात आले. तर शासनाकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज कोकणसाठी जाहीर केले. आतापर्यंत मच्छिमार, बागायतदार, शेतक-यांना तुटपुंजीच नुकसान भरपाई मिळत होती. मात्र ठाकरे सरकारने सर्वाधिक नुकसान भरपाई तौक्ते चक्रीवादळातील नुकसान ग्रस्तांना दिली आहे. एलईडी मच्छिमार व पर्ससीन नेटच्या मच्छिमारीबाबत शासनाने समिती नेमली असून या समितीच्या बैठकीमध्ये आपणाला निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकिमध्ये एलईडी मच्छिमारी बंद करा म्हणून आपण सांगितले आहे. वायफळ पत्रकार घेवून चर्चा करणारे अनेक नेते आहेत. मात्र आपण प्रत्यक्ष समितीच्या बैठकीमध्ये मच्छिमारांना न्याय मिळण्यासाठी एलईडी मच्छिमारीबद्दल विरोध दर्शविला आहे. यामुळे शेतकरी मच्छिमार बांधवांचे हित जोपासणे, हेच शिवसेनेचे काम आहे. राजकारणापेक्षा समाजकारण करुन आज शिवसेना पक्षाने विकास कामांवरती भर दिला आहे. कुणकेश्वर व आंगणेवाडी या तिर्थक्षेत्रांना महाविकास आघाडी सरकारने तेथील विकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी बहुतांश प्रमाणात खर्च देखील झाला आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारवरती कुणकेश्वर व आंगणेवाडीची कृपादृष्टी आहे. यामुळे कोणीही या सरकारच्या विरोधात कितीही खोटेनाटे आरोप केले तरी हे सरकार अभेद्य राहून गोरगरीब जनतेला केंद्रबिंदु ठेवून विकास करीत राहणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. एलईडी व पर्ससीनच्या मच्छिबांधवांकडून आपण पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत. मात्र असे आरोप राणे कुटुंबियांनी सिध्द करावे. सिध्द झाल्यास मी राजकारण सोडून देईन, असा टोला देखील पालकमंत्री सामंत यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page