मुंबई /-

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. ऍन्टीजेन चाचण्यांवर भर द्यावा त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजनचे बेड वाढविण्यात यावे. जिल्ह्यासाठी चार अंकी हेल्पलाईन क्रमांक निर्माण करावा. जिल्ह्यात टास्क फोर्स तयार करा, अशा सुचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेतला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोरोना उपाययोजना संदर्भात विविध बाबींचा तसेच मागण्यांचा उहापोह केला. त्यावर आरोग्य मंत्री म्हणाले, १५ सप्टेंबर पासून राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिम सुरू होत आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे. चंद्रपूर जिल्ह्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याचे आवश्यकता असून हे प्रमाण १५ ते २० पर्यंत वाढवावे. जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी नवीन यंत्रसामुग्री देण्यात येत असून येणा-या कालावधीत ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांसाठी नवीन लॅब सुरू होईल. जिल्हाधिका-यांनी यासाठी पाठपुरावा करून तातडीने लॅब सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

समाज आरोग्य अधिकारी पदासाठी परिक्षा घेण्याचे काम सुरू असून, यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी तातडीने ५० डॉक्टरची सेवा घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. रूग्णवाहिकेसंदर्भात तक्रार येता कामा नये. खाजगी रूग्णवाहिका जिल्हाधिका-यांनी ताब्यात घ्याव्यात. असेही, त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी जिल्ह्यामध्ये टास्कफोर्स स्थापन करण्याच्या सुचना देतानाच, जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड आणि हेल्पलाईन सुरू करतानाच गंभीर रूग्णांसाठी टेलीआयसीयु सुविधेच्या माध्यमातून उपचार करण्याच्या सुचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाणे यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page