सिंधुदुर्गनगरी /-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे. त्याचे लोकार्पण आज ७ मे रोजी सायंकाळी ०५:३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.श्री. सामंत म्हणाले, आज खनिकर्म निधीमधून देण्यात आलेल्या,रुग्णवाहिकांचाही लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तसेच आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्याची ऑक्सिजची गरज लक्षात घेऊन जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉसिंट्रेटर देण्यात येणार आहेत. खासदार विनायक राऊत यांनी कोविड – १९ च्या स्थितीत जिल्ह्याची गरज लक्षात घेता रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहे. हे इंजेक्शन आज शासकीय जिल्हा रुग्णालय यांच्याकडे या लोकार्पण सोहळ्यात सुपूर्त केली जाणार आहेत. अशी माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.