मालवण /-

मालवण किनारपट्टीवर काम करणाऱ्या परराज्यातील खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यात मूळ गावी परतणाऱ्या खलाशी वर्गाला ई-पास सुलभ मिळावा या मागणी बाबत ट्रॉलर मालक संघटनेने आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. याबाबत आम. नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष विकी चोपडेकर यांनी दिली आहे. मत्स्यदुष्काळ आणि त्या जोडीला कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन याचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायाला बसला आहे. मालवण किनारपट्टीवर बहुतांश मासेमारी बोटी एक महिना आधीच किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहेत. या बोटींवर कामास असलेला सुमारे ५०० पेक्षा जास्त खलाशी वर्ग हा घरी जाण्याच्या तयारीत आहे. मात्र कोरोना लॉकडाऊन कालावधीमुळे कर्नाटक, झारखंड, आंध्रप्रदेश या आपल्या मूळ गावी जाणाऱ्या खलाशी वर्गासमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मालवण ट्रॉलर-मालक संघटना अध्यक्ष विकी चोपडेकर, संदीप कोयंडे, पंकज सादये, तपस्वी मयेकर यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन ई-पास बाबत निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधून परराज्यात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या खलाशी वर्गाला ई-पास बाबत येणाऱ्या समस्या दूर करून प्रवास पास सुलभपणे मिळण्याबाबत मागणी केली. याला जिल्हा प्रशासनाकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती विकी चोपडेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page