मालवण /-
सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठ्यपुस्तके शाळांनी त्यांच्याकडून परत घेऊन त्याचा अहवाल २ मे पर्यंत सादर करण्याचा अजब फतवा काढल्याने मुख्याध्यापकांसह विद्यार्थी आणि पालक वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असताना पुस्तके जमा कशी करायची हा विद्यार्थी व पालकांसमोर प्रश्न पडला असून याबाबत सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला फतवा रद्द करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यावर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर त्यापुढील २०२०- २१ हे शैक्षणिक वर्ष कोरोना महामारीमुळे शाळा बंदच राहिल्याने वेळेत सुरू होऊ शकले नाही. मात्र तरीही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या पुस्तकांचे वाटप प्रत्येक शाळेकडून करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यातील शाळा अटी नियमासह सुरू करण्यात आल्या. तर यावर्षी मार्च महिन्यापासून राज्यभर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या.
सर्व (समग्र) शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठपुस्तके वाटप या उपक्रमाखाली विद्यार्थ्यांना वाटप केलेली सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करण्याबाबत मार्गदर्शन मिळाले असून त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील शालेय पाठपुस्तके शाळा स्तरावर जमा करण्यात यावी व त्याचा अहवाल २ मे पर्यंत सादर करावा. याबाबतचे पत्र गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांना पाठविले आहे. मात्र याबाबत शाळांसह पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना काळात शाळा सुरू झाल्या तरी वर्गातील विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे गट पडून त्याप्रमाणे दरदिवशी विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले जात होते. तर कोरोनाच्या भीतीने काही विद्यार्थी शाळेत न फिरकल्याने प्रत्यक्ष शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मार्यदितच होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलेले पुस्तके ही त्यांच्या कडेच राहिली आहेत. तर शैक्षणिक वर्ष अखेरच्या टप्प्यात असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून पुस्तके जमा करण्याची प्रक्रिया देखील थांबली आहे. अशातच कडक निर्बंध व संचारबंदी असल्याने विद्यार्थी व शाळेचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे. वाढता कोरोना संसर्ग व संचारबंदी यामुळे विद्यार्थी शाळेत येऊन पुस्तके जमा करू शकत नाहीत तसेच शिक्षकही फिरू शकत नाहीत. त्यामुळे सध्याची गंभीर परिस्थिती पाहता कोणत्या आधारावर शिक्षण विभागाने पुस्तके जमा करून घेण्याचा आदेश काढला आहे ? असा सवाल विविध शाळांच्या मुख्याध्यापक, ग्रंथपाल व शिक्षकांकडून विचारला जात असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.