सिंधुदुर्गातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून काम : पांडुरंग नाटेकर
वेंगुर्ला /-
वेंगुर्ला –
शिवसेनेचे कुडाळचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी काल मुख्यअधिकारी यांचे दालनात प्रवेश करुन त्यांचेशी उच्च आवाजात वाद घातला. तसेच दालनातील वस्तूंची तोडफोड केली व मुख्यअधिकारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच त्यांना मारण्यासाठी धावून गेले. सदर प्रकरणी कर्मचा-यांना यामध्ये न पडण्याचा दम दिला. या प्रकरणाचा म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन तर्फे जाहीर निषेध केला आहे. तसेच आज शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे कर्मचारी सदर घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करीत आहेत, अशी माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांनी दिली.
नगरपरिषद कर्मचा-यांना भयमुक्त काम करता यावे व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे करीता जिल्ह्यातील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत तर कुडाळ नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी. या करीता काल २२ एप्रिल व आज २३ एप्रिल पर्यंत काम बंद आंदोलन करीत आहेत, सांगितले. दरम्यान कायदा सर्वांना समान असून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल आपली बाजू मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी कायदेशीर मार्गा अवलंब करावा असे आवाहन नाटेकर यांनी केले आहे.