गटनेते नागेंद्र परब, संजय पडते यांचा गंभीर आरोप;पाहणी दौऱ्यात माहिती उघड..
सिंधुदुर्गनगरी /-
विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नाटळ मतदारसंघातील विकासकामांमध्ये अनियमितात दिसून येत असल्याचे पाहणी दरम्यान समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून १० दिवस झाले तरी कामांची पाहणी झालेली नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी सामील असल्याचा आरोप शिवसेना गटनेत नागेंद्र परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी केला आहे. याबाबत गटनेते नागेंद्र परब व सदस्य संजय पडते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यात, गेले अनेक दिवस नाटळ जिल्हा परिषद विभागातील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या घटनेला १० दिवसांपेक्षा जास्त काळ होऊन देखील चौकशी समिती घटनास्थळी दाखल झालेली नाही. २० एप्रिल रोजी आपण जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या मतदारसंघात प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. त्यावेळी विकासकामे पूर्ण न करता त्या कामाची देयके काढण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. परंतु नेमून दिलेली समिती जाग्यावर पोचलेली नाही. त्यामुळे तकलादू स्वरूपात कामे करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न दिवसरात्र सुरू आहेत. पाहणी वेळी समक्ष कनेडी विठ्ठल मंदिर रस्त्यावर मोरीचे बांधकाम व त्याचे काँक्रेटिकरण सुरू होते. त्याचेही काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या मतदार संघातील कामात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.