मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे यांना करण्यात आली अटक..

मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश भोगटे यांना करण्यात आली अटक..

मुख्यधिकारी मारहाण प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील एका प्लॉटिंगच्या विषयावरून शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यात मुख्याधिकारी यांच्या दालनात टोकाचे वाद झाले. या प्रकरणी गणेश भोगटे यांनी मुख्याधिकारी गाढवे यांना शिवीगाळ करीत खुर्ची उचलुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गणेश भोगटे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. सदरची घटना समजताच जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच कुडाळातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी तक्रार दिली की, गुरूवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दालनात नगरसेवक गणेश भोगटे हे आले व त्यांनी त्यांनी शिवाजी पार्क मधील सर्वे नंबर ची मोजणी बाबतचे पत्र तुम्हाला प्राप्त असूनही तुम्ही त्यांचे पैसे भरून योजनेची कार्यवाही का करत नाही अशी विचारणा करू लागले.
त्या वेळी गाढवे यांनी प्रस्तावातील सर्वे नंबर व्यतिरिक्त असलेल्या सर्वे नंबर मोजणी करण्याकरिता प्रस्ताव सादर करणार आहोत. मंजुरी प्राप्त सर्वे नंबर ची मोजणी करून घेतल्यास फक्त काही गट धारकांना जाणीवपूर्वक लक्ष केले जाते असे होईल. त्यामुळे आपण सर्व वीस ते पंचवीस सर्वे नंबर पाठवून त्याप्रमाणे मंजुरी घेऊन मोजणी चे पैसे भरून पुढील कार्यवाही करणार असे समजावून सांगत असताना भोगटे यांनी माझा कालावधी संपत आहे तुम्ही काहीच करणार नाही असे सांगत शिवीगाळ केली. तसेच केबिनमधील स्टीलची खुर्ची माझ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षेकरिता लावलेली प्लॅस्टीकची काच फुटली. त्यानंतर भोगटे यांनी मारण्याची धमकी दिली. यावेळी केबीन मध्ये होणारा आवाज ऐकून नगरपंचायत कर्मचारी स्वप्नील पाटील, प्रसाद नाईक, शिपाई यांनी केबिनचा दरवाजा उघडला. तसेच नगराध्यक्षओंकार तेली यांनी येत गणेश भोगटे यांना बाहेर नेत नगराध्यक्ष दालनात बसविले. यावेळी जगतानाही त्यांनी मी सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर कार्यालय अधीक्षक सुरेश परब व नगराध्यक्ष तेली यांनी केबिनमध्ये येऊन माहीती घेतली
त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना भोगटे यांनी दरवाज्यावर अडवून उत्तर दिल्याशिवाय बाहेर पडायचे नाही असे सांगत अडवुन धरले. त्यानंतर कर्मचारी संदीप कोरगावकर यांनी भोगटे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार दिली.
गाढवे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गणेश भोगटे यांच्यावर मुख्याधिकारी गाढवे यांना शिवीगाळ करून, खुर्ची मारण्यासाठी मारण्याचा प्रयत्न केला, शासकीय कामात अडथळा आणत जीवे मारण्याची धमकी दिली, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 353, 341, 504, 506 व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक केली असून घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी जात पंचनामा ही केला आहे अधिक तपास पोलिस करीत आहेत.

नगरपंचायत काम बंद
सदरच्या घटनेनंतर नगरपंचायती मधील सर्व अधिकारी, कर्मचारी हे कुडाळ पोलिस ठाण्यात गेले. यावेळी नगरपंचायतीचे काम काहीकाळ बंद होते. तसेच दरवाजा ही बंद ठेवण्यात आला होता. मुख्यधिकारी मारहाण प्रकरणात आज कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे.

अभिप्राय द्या..