आरोग्य कर्मचारी प्रचंड तणावाखाली.. आता जनतेनेच शासन आदेश व सूचनांचे कटाक्षाने पालन करून पुढील आठ दिवस घराबाहेर पडणे टाळावे…
कुडाळ /-
राज्यासह जिल्ह्यातही कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती अतिशय गंभीर निर्माण झालेली आहे असे चित्र आहे. दैनंदिन वृत्तपत्र तसेच मीडियातून कोरोनासंबंधी मृत्यूदराच्या येणाऱ्या बातम्या चिंतेचा विषय असून मन सुन्न करणारा आहे. संपूर्ण प्रशासन व्यवस्था शर्थीचा मुकाबला करत असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी दिनरात राबत आहे, मात्र आता जनतेने संयम दाखवण्याची वेळ आलेली आहे असे म्हणावे लागेल. दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आलेख परिस्थितीचे गांभीर्य दाखवणारा असून आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे ही देखील दिलासादायी बाब आहे. परंतु त्यांनाही काही मर्यादा आहेत त्या विसरून चालणार नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. त्यामुळे जनतेनेच आता या लढाईत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शासनाकडील पारित आदेश व नियमांचे तंतोतंत पालन करीत पुढील आठ दिवस घराबाहेर पडणे टाळावे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव साखळी थांबून रुग्णसंख्या आटोक्यात आली तरच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन ती आणखी प्रभावीपणे काम करणार आहे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा पुढील आठ दिवस संयम बाळगून अनावश्यक घराबाहेर न पडता जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.