कुडाळ /.

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट असून या संकटामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला जीवन जगणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध कोविड रुग्णालये रुग्ण संख्येमुळे तुडुंब भरली असून शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची सेवा पुरवणे अशक्य होत आहे. भविष्यात ही बाब आणखी भयानक व गंभीर स्वरूप धारण करेल अशी शक्यता आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष द्यावे असे आवाहन “कमळ प्रतिष्ठान” या संस्थेने निवेदनाद्वारे केले आहे. आजवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत संयम आणि कौशल्याने सांभाळलेली आहे, तरीही यावेळचे आव्हान फार मोठे आहे. याचे योग्य नियोजन न झाल्यास जिल्ह्यातील जनतेला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, अशी भीतीही “कमळ प्रतिष्ठान” चे अध्यक्ष श्री अविनाश पराडकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी किमान ५० बेडचे कोविड सेंटर उभे केल्यास संपूर्ण जिल्हाभरातून सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे येणार्‍या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्गात ओरोस येथील शासकीय व खासगी रुग्णालयांवर आणि प्रशासनावर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच जिल्ह्यातील सर्वच तालुका परिसरातील नागरिकांची आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सुव्यवस्थित सोय होईल. कोविड सेंटर बाहेर काळजीपोटी नातेवाईकांची होणारी गर्दी आणि प्रचंड धावपळ कमी होईल. तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर उपलब्ध झाल्यास सोबतच्या नातेवाईकांसह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्‍यांना देखील ते सोयीचे होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रत्येकी ५० बेडचे कोविड सेंटर तात्काळ उभारणी करून त्यामध्ये अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यात याव्यात, असेही या निवेदनात म्हंटले आहे.

प्रत्येक तालुक्यात उभारणी करण्यात येणाऱ्या या कोविड सेंटरमध्ये बेड्स ऑक्सिजन सुविधेसह लागणारे मनुष्यबळ, पलंग, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, व्हेंटिलेटर मशीन, इंजेक्शन, मॉनिटर, मशीन स्टॅन्ड, स्वच्छता कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर, संडास बाथरूम दुरुस्ती, खिडक्यांना पडदे बसविणे, कोविड सेंटर च्या बाजूला पेवर ब्लॉक बसविणे यासह इतर किरकोळ दुरुस्ती साठी लागणारी व्यवस्था लोकप्रतिनिधींचा आमदार फंड, जिल्हा नियोजन विभागातून आरोग्यासाठी अधिकचा राखीव निधी उपलब्ध करून, आपत्कालीन व्यवस्थापन निधीमधून तसेच सीएसआर फंडातून करण्यात यावी. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन या संकटकाळात काम करावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था चांगले काम करत आहेत. ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्स सारखी उपकरणे व अन्य साहित्यासाठी या संस्थांना आपल्या पातळीवर आवाहन करण्यात यावे. आपल्या नियोजनाखाली सर्वांच्या सहयोगातून या संकटाशी लढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज होईल याचा विश्वास वाटतो असा आशावादही निवेदनात व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page