वेंगुर्ला /-
कुडाळतिठा ते कुडाळ रस्ता दुरावस्थेबाबत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी कार्यकारी अभियंता – सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन सादर केले आहे.याबाबत संबंधित विभागाकडून येत्या १५ दिवसात काहीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल,असा आक्रमक इशारा देताना बांधकाम विभागाचे श्राद्ध,रस्ता रोको यासारखे उपाय केले जातील,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,कुडाळतिठा ते कुडाळ,पंदूर ते घोटगे असे या रस्त्याचे नाव आहे.कुडाळ ते पंदूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्याचे दोन भाग झाले.आम्ही अनेक वर्षे कुडाळ पर्यंतचा रस्ता वेंगुर्ला कार्यालयाकडे द्यावा,अशी विनंती करीत आहोत.कारण वेंगुर्ला विभागाकडे काम कमी आहे.मात्र त्याला यश येत नाही.गेली ११ वर्षे या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.दरवर्षी खड्डे बुजविण्याचे ‘ वार्षिक’ काम उरकले जाते.या मार्गावर शाळा असून वेतोरेच्या एका शाळेत ९०० मुले आहेत.मात्र मुलांना चालायला रस्त्याला साईडपट्टीच नाही.त्यावर झाडी वाढलेली आहे.खड्ड्यांचे साम्राज्य आहे.गल्ली बोळातील रस्ते मजबूत होत असताना याच रस्त्यावर आपली नाराजी का? कारण पंदुर ते घोडगे साठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचे वाचले.मात्र या १० किमी साठी निधी का नाही ? या भागाचे दोन्ही आमदार दिपक केसरकर व वैभव नाईक शिवसेना महाविकास आघाडीचे आहेत.तरीही या रस्त्यावर अन्याय होत आहे.शाळेतील मुले,दुचाकी,रिक्षा,लहान चारचाकी वाहनधारक यांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.मोठी वाहने,ट्रक,डंपर,खाजगी बसेस भरधाव वेगाने जाताना पादचारी तसेच “मुलांची” काय अवस्था होते,हे कदाचित *अधिकाऱ्यांच्या* लक्षात येत नसावे.याबाबत वारंवार पत्रव्यवहार होत असून या रस्त्याला कोण वाली नाही का?वरील रस्ता,साईडपट्टी,गटार कामासह त्वरित दुरुस्त होणे आवश्यक आहे.याबाबत आपल्या विभागाकडून येत्या १५ दिवसात काहीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल,असा आक्रमक इशारा एम.के.गावडे यांनी सा.बां. विभाग ला दिला आहे.तसेच याबाबतची प्रत उपअभियंता सा.बां. विभाग कुडाळ यांनाही देण्यात आली आहे.