राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कृष्णाजी दळवी याना जाहीर..

राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कृष्णाजी दळवी याना जाहीर..

मसुरे /-

महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार पोईप गावचे सुपुत्र, बुधवळे- कुडोपी व आडवली- मालडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कृष्णाजी रामचंद्र दळवी याना जाहीर झाला आहे.पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्काराचे वितरण मंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाने सदर पुरस्कारांची घोषणा केली आहे. शासन आणि प्रशासन यातील दुवा म्हणून काम करताना शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य ग्रामस्थांना मिळावा यासाठी दळवी यांचा नेहमी प्रयत्न असतो. पोईप ग्रामपंचयतचे कर्मचारी म्हणून काम केलेल्या दळवी यांनी २०११ मध्ये मठबुद्रुक गावचे ग्रामसेवक म्हणून सेवेची सुरवात केली. सातत्याने दोन ग्रामपंचायतचा पदभार सांभाळताना दोन्ही गावांना सारखा न्याय देण्याचा ते काम करतात. यापूर्वी त्यांनी मठबुद्रुक, राठीवडे येथे काम केले असून सध्या ते बुधवळे- कुडोपी आणि आडवली-
मालडी या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहेत. मालवण तालुक्यात सातत्याने १००% घरपट्टी वसुली मध्ये त्यांची विशेष नोंद आहे. १००%घरपट्टी वसुली बरोबरच यशवंत पंचायत राज अभियानात मठबुद्रुक ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर यश प्राप्त केले होते. बुधवळे ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम अभियानात यश मिळवत १०लाख रूपयांचे पारितोषिक मिळविले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियानात सतत तीन वर्षे तालुक्यात प्रथम, बुधवळे ग्रामपंचायतीला डॉ आबासाहेब खेडेकर विशेष पुरस्कार त्यांच्याच कारकिर्दीत प्राप्त झाला होता. २०१८-१९ मध्ये २५ बायोगॅसचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे तालुक्यात प्रथम ग्रामपंचायतचा मान मिळाला होता. प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सतत पाठपुरावा त्यांनी केला आहे. ४० घरकुल पूर्ण झाली आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीना पर्यावरण विकास रत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत.स्वतः ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम केलेले असल्याने ग्रामसेवक म्हणून काम करताना, विविध योजना गावात राबविताना त्यांना सोपे झाले. लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाव्यात यासाठी ते विशेष मेहनत घेतात.
आजवरच्या कारकिर्दीत जी प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम, मालवण गटविकास अधिकारी, सहा. गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,व सर्व सदस्य, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे चांगले काम करू शकल्याचे मत दळवी यांनी व्यक्त केले आहे. दळवी यांच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..