आनंद यात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांचे मार्फत “अनंतात आशा ‘ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

आनंद यात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांचे मार्फत “अनंतात आशा ‘ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

वेंगुर्ला /-

श्री देवी सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ले व आनंदयात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने शिरोडा येथील नवोदित कवयित्री सुवर्णा सोनारे – चरपे यांच्या ‘अनंतात आशा’ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा साई मंगल डिलक्स हॉल याठिकाणी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आनंदयात्री वाडःमय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी या होत्या.या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध गझलकार व नवव्या अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमठवणारे तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.मातीचे उत्खनन करतात,तसे सुवर्णा चरपे यांच्या कविता भावनांचे उत्खनन करतात असे, गौरवोदगार काढतानाच डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करीत चरपे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तर गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी आपल्या नेहमीच्या ढंगात आपल्या गझल सादर केल्या व वृंदा कांबळी यांचा आशीर्वाद चरपे यांना मिळाला तिथेच त्यांच्या कविता यशस्वी झाल्या, अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या.
वृंदा कांबळी यांच्या प्रेरणेने माझे कविता लिखाण प्रगल्भ झाले व यापुढे सतत लिखाण सुरू राहील अशा शब्दात नवोदित कवयित्री सुवर्णा चरपे यांनी मनोगत व्यक्त केले.वृंदा कांबळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कार्याचा आढावा घेतला व सुवर्णा चरपे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सोहळ्यास सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, उपाध्यक्ष रवि परब,आदित्य खानोलकर,डॉ.संजीव लिंगवत, महेश बोवलेकर,सर्पमित्र महेश राऊळ,किरण राऊळ,पांडुरंग कौलापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत नाईक यांनी ,पाहुण्यांची ओळख संजय पाटील यांनी, सुत्रसंचालन कु.पूजा बोवलेकर हिने तर आभार प्रा.सचिन परुळकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृंदा कांबळी.प्रा.सचिन परुळकर,संजय पाटील, महेश राऊळ,किरण राऊळ व कु.निर्जरा पाटील यांनी प्रयत्न केले.प्रकाशन कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद खानोलकर यांनी सुवर्णा चरपे यांची प्रकट मुलाखत घेतली.त्यालाही रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

अभिप्राय द्या..