मसुरे कावावाडी येथील त्या घटनेने व्यक्त होतेय हळहळ!

मसुरे कावावाडी येथील त्या घटनेने व्यक्त होतेय हळहळ!

मसुरे /-

मोठ्या भावाच्या निधनानंतर केवळ एक दिवसाने छोट्या भावाने सुद्धा जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना मसुरे कावावाडी येथे घडली आहे. येथील दत्ताराम आबाजी राणे ( वय ६८ वर्ष) व चंद्रकांत आबाजी राणे (वय ६२ वर्ष) हे दोघे सख्ये भाऊ. मागील काही महिने दत्ताराम हे कॅन्सर ने आजारी होते. त्यांच्यावर पुणे, कोल्हापूर येथे उपचार चालू होते. परंतु उपचारांना त्यांचे शरीर साथ देत नव्हते. तर चंद्रकांत हे सुद्धा मूत्रपिंडाच्या आजाराने आजारी होते.
दोघेही भाऊ एकमेकांच्या नेहमी जवळ असल्याने सुख दुःखात एकत्र असायचे. तसेच आजारपणामुळे दवाखान्यात उपचार चालू असतानाही ते दोघेही एकमेकांची खुशाली घेत होते. मागील पंधरा दिवस दत्ताराम यांच्यावर सावंतवाडी येथे उपचार चालू होते तर चंद्रकांत याना मालवण येथील खाजगी दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता. २० मार्च रोजी दत्ताराम यांचे निधन झाले नंतर अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांचे पार्थिव राहत्या घरी कावा वाडी येथे आणण्यात आले होते.
दरम्यान दत्ताराम यांच्या मृत्यूची घटना समजू नये यासाठी चंद्रकांत याना एक वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते व घटनेची माहिती मिळू नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. परंतु कोणीही याबाबत त्यांना माहिती न सांगता चंद्रकांत याना याबाबत कळाले. आपल्या मोठ्या भावाचे निधन झाले या मानसिक धक्यानेे एक दिवसाच्या फरकाने २२ मार्च रोजी चंद्रकांत यांनी सुद्धा अंतिम निरोप घेतला. केवळ एक दिवसाचा फरकाने दोन सख्या भावांचे निधन झाल्याने राणे कुटुंबियांवर अकस्मात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दत्ताराम यांच्या पश्चात दोन मुलगे, सून नातवंडे तर चंद्रकांत यांच्या पश्चात दोन मुलगे, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..