कुडाळ /-
आचरा पारवाडीतील कोळंबी प्रकल्पामुळे पारवाडी, डोगरेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनित व वाडीतल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पूर्णतःदुषित होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पा विरोधात ग्रामसभेत जोरदार आवाज उठवला होता. शनिवारी आचरा दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी याची दखल घेत आचरा पारवाडी, डोगरेवाडीतील ग्रामस्थानी चर्चा केली. आमदार नाईक यांनी प्रकल्पा बाबत निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा करत, प्रकल्पामुळे निर्माण झालेली परिस्थिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. यावेळी आमदार नाईक यानी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामस्थांसोबत भेट घेवून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन ग्रमास्थाना दिले.
प्रकल्पामुळे पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्यांना निर्माण झालेल्या अडचणींबाबतचे म्हणणे जाणून घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी आमदार नाईक आचरा पारवाडीत दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जगदिश पांगे आचरा डोंगरेवाडीचे सुपुत्र आबा दुखंडे तसेच आचरा पारवाडी डोगरेवाडीतील ग्रामस्थ सचिन परब, रविंद्र बागवे, परशुराम शेटये, राजू नार्वेकर, सचिन दुखंडे, दिपक गावडे, प्रदिप केळकर, रविंद्र केळकर, बापू कदम, भिकाजी कदम, महेंद्र राणे, अनंत परब, श्रीपाद सावत, सचिन बागवे व अन्य ग्रामस्थ हजर होते.
पारवाडीतील कोळंबी प्रकल्पामुळे या पुर्वीही आचरा पारवाडीला पुराचा सामना करावा लागला आहे. यात घरेदारही वाहून गेली होती. यानंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. आता हा प्रकल्प गेल्यावर्षी पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. याचे भयानक दुष्परीणाम आता पुन्हा आम्हाला भोगावे लागत आहेत. जर हा प्रकल्प बंद नाही झाला, तर या भागातील विहिरीचे पाणी मोठया प्रमाणात दुषित होण्याची भीती ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केली.खारलॅंडबंधाऱ्यावर प्रकल्पधारकाने अनधिकृत बांधकाम केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून. त्या मुळे ग्रामस्थांचा येजा करण्याचा मार्गही बंद झाला असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या बंधाऱ्याच्या भिंतींची उची वाढवली आहे. यामुळे पारवाडीला मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. प्रकल्प धारकाने लगतचे कांदळवनही मोठ्या प्रमाणात तोडून टाकल्याची माहिती यावेळी आमदार नाईक यांना ग्रामस्थांनी दिली.
प्रकल्पाची नुसती पाहणी करून हा प्रश्न सुटणारा नाही. यासाठी आपणास रितसर प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रकल्पामुळे उद्भवलेली परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामस्थांन समवेत भेट घेवून निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. जोपर्यंत यावर योग्य तो तोडगा निघत नाही, तोपर्यंत प्रकल्प चालू करू न देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी द्याव्यात अशी मागणी करणार असल्याचे आमदारांनी सांगितले, यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेवून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आमदार नाईक यांनी ग्रामस्थांना सांगितले.