वेंगुर्ला /-
गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ शेतकरी शेती विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. तीनशे पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. परंतु मोदी सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. तसेच पेट्रोल व डिझेल वर भरमसाठ कर लाऊन देशातील जनतेला लुटण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून गृहिणींच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.२६ मार्च रोजी देशातील शेतक-यांनी काळ्या कृषी कायद्याच्या व महागाईच्या विरोधात ‘भारत बंद’ पुकारला आहे. शेतक-यांच्या या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालया समोर काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत उपोषण करण्यात येणार आहे, अशी महिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी दिली.