कुडाळ /-

बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपातून कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन बळीराम तांबे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी.पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर व ॲड प्रणाली मोरे यांनी काम पाहिले. मोहन तांबे याने आवलेगाव ग्रा.प.मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना सन ३ जुलै २००९ ते २६ सप्टेंबर २००९ या कालावधीत बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा ९५ हजार ३९३ रुपयाचा अपहार केला होता.त्याच्यावर अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.खोटे दस्तऐवज तयार करून तसेच खरेदीच्या खोट्या पावत्या तयार करून निधी खर्च केल्याचे दाखविले. शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका तांबे याच्यावर ठेऊन त्याच्या विरुद्ध कुडाळ पोलिसा ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.कुडाळ प.स चे तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी आनंद कुंभार यांनी २६ एप्रिल २०११ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तांबे याच्यावर भादवि कलम ४०९ ,४६७ व ४६८ अन्वये गुन्हा दाखल करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ लेखापाल क. तू.परब यांनी वार्षिक लेखापरीक्षण अहवालात दोन लाख ५२ हजार ७९६ रुपयाचा अपहार झाल्याचे नमूद केले होते. हा लेखा परीक्षण अहवाल दिलेली अपहार रक्कम व फिर्यादिमधील नमूद अपहार रक्कम यातील तफावत तसेच तपास कामातील त्रुटी ॲड मांडकुलकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.त्या ग्राह्य मानून न्यायालयाने तांबे याची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page