वेंगुर्ला /-

महाराष्ट्र शासनाने राज्यातील पाचशे शाळा ‘ मॉडेल स्कुल’ म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा यात समावेश असून वेंगुर्ले तालुक्यातील जि. प.केंद्रशाळा उभादांडा नं.१ या शाळेचा यात समावेश करण्यात आल्याने शैक्षणिक तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
उभादांडा नं.१ शाळेस नगर वाचनालय वेंगुर्लेचा सन १९९५ चा आदर्श शाळा पुरस्कार,जि.प.सिंधुदुर्गचा सन २००३ – २००४ चा आदर्श शाळा पुरस्कार,शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत सन २००७ -२००८ मध्ये शाळा तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तिसरी आली आहे.शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या या शाळेत सन १९८८ पासून ६९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरलेले आहेत.शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती,शाळेचे माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्याने संपूर्ण शाळा डिजिटल करण्यात आली आहे.शासनामार्फत स्वतंत्र संगणक कक्ष,प्रयोगशाळा व व्हर्च्युअल क्लासरुम या सुविधा प्राप्त आहेत.शाळेत ई-लर्निंग,स्काऊट- गाईड पथक,योगासने,लेझिम पथक,उत्कर्षा उपक्रम, विविध कलामंच,संगीतमय मूल्यशिक्षण तासिका,विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र इंग्लिश स्पिकिंग वर्ग,पालकांसाठी आनंददायी पालकत्व उपक्रम राबविला जातो.शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ व शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती यांचे शाळेला सहकार्य मिळते.भविष्यात मुलांच्या शारीरिक,बौद्धिक व मानसिक विकासावर भर दिला जाणार आहे.स्पर्धा परीक्षा तयारी,क्रीडा विषयक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित होण्यासाठी प्रात्यक्षिकांवर भर,दप्तरमुक्त उपक्रम हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.आदर्श शाळा निवडीसाठी सहकार्य लाभलेले शाळेच्या विविध समित्या,माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती,पालक वर्ग,माजी शिक्षक,शिक्षिका,आमदार,जि.प.सदस्य,पं. स.सदस्य,सरपंच व सदस्य,विद्यमान सभापती अनुश्री कांबळी आदींचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सायली तांडेल व मुख्याध्यापक झिलू घाडी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page