वेंगुर्ला /-

पणजी ते वेंगुर्ला सायंकाळी ६.४५ वा.सुटणारी बस काल मंगळवारी बंद ठेवल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.तसेच ६.४५ ते ८.१५ या वेळेत टेलिफोन बंद लागत होता.याबाबत आपण डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क केला असता ते रत्नागिरी येथे होते.त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही.दरम्यान डेपोमधून फोन कट करण्यात आला.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.सर्वसामान्य तसेच नोकरदार वर्ग,महिला व इतर प्रवाशांना अशा प्रकारे नाहक त्रास झाल्यास शिरोडा बस स्थानकातून एकही बस सोडली जाणार नाही, असा आक्रमक इशारा वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी वेंगुर्ले एस.टी. च्या अधिकाऱ्यांना दिला.यावेळी आज बुधवार पासून ही बस रेग्युलर सोडण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच ५.३० वा. सुटणारी म्हापसा वेंगुर्ला ही बंद करण्यात आलेली बस सुरू करण्यात यावी,अशी सूचना भाई परब यांनी केली.याबाबत स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी सदर बस सोमवार पासून सुरू करण्यात येईल,असे सांगितले.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा आज बुधवारी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाली.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पवार, गटविकास अधिकारी उमा पाटील,पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर,शामसुंदर पेडणेकर, सदस्या साक्षी कुबल,गौरवी मडवळ,विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती सुनिल मोरजकर यांनी विविध मुद्यांवर ठराव – सूचना मांडल्या.कोकणातील अर्थव्यवस्था आंबा – काजू बाग बागायतीवर अवलंबून आहे.ठिकठिकाणी आकस्मिक बागायतींना आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत.तसेच मे महिन्यातही असे प्रकार होतात.याबाबत अशा बाबतीत विमा संरक्षण मिळावे व तरतूद करावी,अशी सूचना सुनिल मोरजकर यांनी मांडली.यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले.तसेच वणव्याबाबत योजना नाही,असे सांगितले.जि.प.मार्फत शेतकऱ्यांना प्रतिगुंठा मिळणाऱ्या अनुदानाबाबत माहिती दिली.तसेच ग्रासकटर,ताडपत्री व विविध योजना आदींचे प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत सादर करावेत,असे आवाहन केले.कोव्हीड १९ (कोरोना) मुळे सर्वसामान्य लोकांना विजबिले भरणे शक्य झाले नाही.आता बिले भरमसाठ आली आहेत.सदर बिलातून ‘ वहन खर्च’ वगळून सदरची बिले टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडून घेण्यात यावी किंवा शेती पंपाप्रमाणेच या बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी,अशी सूचना मांडली. तसेच चांदा ते बांदा या योजनेचा सिंधूरत्न योजनेत समावेश केल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मोरजकर यांनी मांडला.यावेळी साक्षी कुबल यांनी आडेली पेडणेकरवाडी येथील येथील नळपाणी योजना सार्वजनिक आहे कि खाजगी आहे ? असा प्रश्न उपस्थित करून प्रत्यक्ष विहिरीची पाहणी करावी,अशी सूचना मांडली. याबाबत भेट देऊन चौकशी करण्यात येईल,असे बीडीओनी सांगितले.तसेच गौरवी मडवळ यांनी वेंगुर्ले कोरजाई वस्तीची बस सुरू करण्यात यावी,अशी सूचना मांडली.दरम्यान सुनिल मोरजकर यांनी आज विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page